भारत-पाक सामन्याने मुंबई स्तब्ध
By admin | Published: June 5, 2017 02:19 AM2017-06-05T02:19:23+5:302017-06-05T02:19:23+5:30
कधीही न थांबणारी मुंबई रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान या उभय संघांमधील सामन्यामुळे स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कधीही न थांबणारी मुंबई रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान या उभय संघांमधील सामन्यामुळे स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले. रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असतानाही मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट होता.
कामाहून अधिक सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे धाव घेतात. त्यामुळे मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या तीनही मार्गांवर होणाऱ्या तुुडुंब गर्दीमुळे प्रवाशांची धांदल उडते. मात्र रविवारी दुपारी मॅच सुरू होणार असल्याने शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही मोजकीच वाहने धावताना दिसत होती. शहरातील मैदाने ओस पडली होती, तर उद्यानांमध्येही लोकांची गर्दी आटली होती. बस स्टॉपसह नाक्यांवर उभ्या टॅक्सी आणि रिक्षा प्रवाशांची वाट पाहत होते. रविवारी ओसंडून वाहणाऱ्या नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, जुहू, गिरगाव, दादरसारख्या चौपांट्यांवरही तुरळक गर्दी दिसली.
काही सलूनमध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून देण्यात आल्या. तर चेहऱ्यावर रंगरंगोटी करून चाहत्यांनी टीम इंडियाला चीअर अप केले. टी.व्ही. शोरूमबाहेरील गर्दी सामन्यातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह सांगून जात होती.