मुंबईसह उपनगरात जोर‘धार’

By admin | Published: July 15, 2017 05:32 AM2017-07-15T05:32:29+5:302017-07-15T05:32:29+5:30

मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला

In Mumbai suburbs, | मुंबईसह उपनगरात जोर‘धार’

मुंबईसह उपनगरात जोर‘धार’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार पावसादरम्यान कुठेही पाणी साचले नसले तरीदेखील पडझड कायम होती. सलग सुरू राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी सकाळीच कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, माहीम, दादर आणि सायन परिसरात तर पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंडसह घाटकोपर आणि कुर्ला येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, पार्ले आणि गोरेगाव येथेही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाचा अधिक जोर असल्याचे चित्र होते. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी बरसलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र पुन्हा सायंकाळसह रात्री जोर पकडलेल्या मान्सूनधारांनी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.
दरम्यान, कुर्ला पश्चिमेकडील सफेद पूल येथे घराची भिंत पडून सहा जण जखमी झाले. यापैकी पाच जणांना पॅरामाउंट या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३० ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहील. पुढील ४८ तास मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
>रायगड जिल्ह्यात
संततधार
रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे २४० मि.मी. झाली आहे. उर्वरित ठिकाणी कर्जत २३६.२० मि.मी., सुधागड १५५.३३, खालापूर १४४, पनवेल ८९.२०, माणगाव ९६, पोलादपूर ७८, रोहा ७३, महाड ७२, अलिबाग ३८, मुरुड २९, उरण ४४, तळा ४२, म्हसळा १५.४०, श्रीवर्धन १४ आणि गिरिस्थान माथेरान येथे १९९.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
>मोडकसागर धरणामुळे पालघरच्या ४२ गावांना धोक्याचा इशारा
ठाणे : जिल्ह्यातील मोडकसागर या धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, खर्डी नदी परिसरात असलेल्या गावांना धोक्याचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालील पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात २४७.४० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे रुंदे येथील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० ते १२ गावांचा टिटवाळा शहराशी थेट संपर्क तुटला.
>पावसाची नोंद
मागील २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३०.८, २६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात २०.७५, पूर्व उपनगरांत ३५.०२ आणि पश्चिम उपनगरांत २२.१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: In Mumbai suburbs,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.