मुंबईसह राज्यात तापमान घटले
By admin | Published: December 23, 2015 01:50 AM2015-12-23T01:50:22+5:302015-12-23T01:50:22+5:30
देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात कमालीची घट नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात कमालीची घट नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी शहराचे किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, या हंगामात नोंदविण्यात आलेले मुंबईचे हे आतापर्यंतचे सर्वांत कमी किमान तापमान आहे. यापूर्वी मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी अनुक्रमे शहराचे किमान तापमान १५, १४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते; तर राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे ७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले की, मंगळवारी कुलाबा वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९.८, २०.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. सांताक्रुझ वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१.६, १३.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे; मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात
सरासरीच्या तुलनेत वाढ झाली
आहे. (प्रतिनिधी)