मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:50 AM2020-10-16T02:50:17+5:302020-10-16T07:09:48+5:30

ग्रंथालयीन कर्मचारी आणि वाचकांतून स्वागत; सात महिन्यांत विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसणार

Mumbai-Thane libraries to have 'Punashch Hariom' from Monday; Government circular issued | मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी

मुंबई-ठाण्यातील ग्रंथालयांचे सोमवारपासून ‘पुनश्च हरीओम’; शासनाचे परिपत्रक जारी

Next

स्वप्निल कुलकर्णी 

मुंबई : कोरोनामुळे सात महिने सार्वजनिक वाचनालये बंद होती. त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्याची मागणी कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, वाचनप्रेमींकडून होत होती. राज्य सरकारने बुधवारी त्यासंबंधी परिपत्रक काढून वाचन प्रेरणा दिनापासून ग्रंथालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु वाचकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना कराव्या लागणार असल्याने मुंबई आणि उपनगरातील बहुतेक सार्वजनिक वाचनालये सोमवारपासून सुरू होतील असे चित्र आहे.

सध्या मुंबई शहरात २९, उपनगरांत ४५ तर ठाणे आणि पालघरमध्ये १४३ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. पुस्तके देवाणघेवाणीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो या भीतीपोटी सात महिने सार्वजनिक ग्रंथालये बंद ठेवण्यात आली होती. पुस्तकांची दुकाने काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती, तरी सार्वजनिक ग्रंथालयांना परवानगी देण्यात आली नव्हती. मंजूर झालेले अनुदानही ग्रंथालयांना अद्याप मिळाले नाही. त्यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी परत कशी बसवायची, असा प्रश्न ग्रंथालय व्यवस्थापनांसमोर होता. मात्र आता शासनाने वाचन प्रेरणा दिवसाचा मुहूर्त साधत सार्वजनिक वाचनालयाची कवाडे पुन्हा खुली करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे ग्रंथालयीन कर्मचारी, वाचक तसेच विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रंथालये ही आधुनिक तीर्थक्षेत्रे आहेत. ती गुरुवारपासून खुली झाली याचा मनस्वी आनंद आहेच. आम्ही शासनाने दिलेले सर्व नियम व अटी यांचे पालन करू. - विनायक गोखले, अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ

वाचकांप्रमाणेच कर्मचारीदेखील ग्रंथालयात येण्यास उत्सुक आहेत. शासनाने दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यासाठी थोडा वेळ घेत आहोत. सोमवारपासून ग्रंथालये नक्की सुरू होतील. - सुनील कुबल, अधीक्षक, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय 

ग्रंथालये कधी सुरू होत आहेत याचीच वाट पाहत होतो. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणारच आहोत. पण त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे. परंतु सर्व तयारीसह सोमवारपासून वाचकांना सेवा देण्यासाठी आम्ही तयार असू. - संदीप पेडणेकर, ग्रंथपाल, माहीम सार्वजनिक वाचनालय

Web Title: Mumbai-Thane libraries to have 'Punashch Hariom' from Monday; Government circular issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.