मुंबई विद्यापीठ प्रशासनाने 'अभाविप'ने केलेल्या मागण्या आज मान्य केल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 07:01 PM2017-09-01T19:01:36+5:302017-09-01T19:03:46+5:30
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाविरोधात आज अभाविपने पुन्हा एकदा कालिना परिसरात आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातील उर्वरित निकाल लवकरात लवकर लावावे, पुनर्मुल्यांकनासाठी जास्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करावी व इतर अनेक मागण्या घेऊन अभाविपने हे आंदोलन केले.
मुंबई, दि. 1 - मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाविरोधात आज अभाविपने पुन्हा एकदा कालिना परिसरात आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातील उर्वरित निकाल लवकरात लवकर लावावे, पुनर्मुल्यांकनासाठी जास्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करावी व इतर अनेक मागण्या घेऊन अभाविपने हे आंदोलन केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आज जोरदर घोषणाबाजी करत अभाविपचे कार्यकर्ते महात्मा फुले भवनात घुसण्याच्या प्रयत्नात होते. काही वेळानंतर सह-कुलसचिव अशोक फर्डे यांनी अभाविपच्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासठी आमंत्रित केले. त्यांच्यासमोर अभाविपने आपल्या विविध्या मागण्या लिखित असेलेले निवेदन सुपूर्त केले.
त्यातील पुढील महत्वाच्या मागण्या मान्य झाल्या:
-ज्या विद्यार्थ्यांना निकालामध्ये गैरहजर घोषित केले किंवा ज्यांचे यापूर्वीचे निकाल उत्तम असूनसुद्धा काही वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट नापास केले आहे अशा सर्व समस्यांचे निराकरण पुढील ३ दिवसांमध्ये करण्यात येईल असे आश्वासन विद्यापीठकडून देण्यात आले.
-पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशाची अंतिम तारीख वाढवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
-ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ५०० रूपयांपर्यंत पुनर्मुल्यांकनसाठी शुल्क घेतले आहे त्यांना सर्क्युलर पाठवण्यात येईल व त्यांना अतिरिक्त शुल्क परत पाठवण्याचे निर्देश देण्यात येईल असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने केले.
-महात्मा फुले भावनातून मराठी भवनमध्ये हलवलेल्या हेल्प डेस्कला पुन्हा महात्मा फुले भवनात लावण्यात येईल असे अभाविपच्या मागणीनंतर विद्यापीठाने जाहीर केले.
“मागील काही महिन्यापासून मुंबई विद्यापीठ चर्चेत आहे ते रखडलेले निकाल, त्यानंतर घोषित झालेले दोषपूर्ण निकाल तसेच परीक्षेला उपस्थित राहून सुद्धा निकालामध्ये अनुपस्थित दाखवलेल्या कारणांमुळे. या प्रकरणाला सुरुवात झाली ती यावर्षीच्या निकाल तपासणीच्या प्रक्रीये मध्ये केलेला बदल. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हेखेखोर भूमिका घेऊन सुरु केलेल्या ऑनलाईन चेकिंग पद्धतीतील असंख्य त्रुटींमुळे पेपर तपासणी प्रक्रियेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. मागील काही दिवसांमध्ये जरी काही निकाल घोषित झाले असले तरीही ते सदोष आहेत. त्यातच मुंबई विद्यापीठाची वेबसाईट सुरु होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे त्यामुळे अभाविप हे आंदोलन केले” असे मुंबई महानगर मंत्री रवि जैसवाल यांनी सांगितले.