मुंबई विद्यापीठाचा 'निकाल' लागणार?, सव्वातीन लाख उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 07:37 AM2017-07-31T07:37:01+5:302017-07-31T08:46:57+5:30
मुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. 90 टक्के मूल्यांकन पूर्ण झाल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.
मुंबई, दि. 31 - मुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. 90 टक्के मूल्यांकन पूर्ण झाल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. पण ३० जुलैच्या रात्रीपर्यंत विद्यापीठाने केवळ १५३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्याने तब्बल ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक आहेत.
तसेच सव्वातीन लाख उत्तरपत्रिका अजूनही तपासलेल्या नाहीत. आतापर्यंत विद्यापीठाने कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत. पण आता एका दिवसात सव्वातीन लाख उत्तरपत्रिका तपासून ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करणे हे अशक्यप्रायच असल्याने मुंबई विद्यापीठाला देण्यात आलेली डेडलाइन चुकल्याचेच स्पष्ट होत आहे.
विद्यापीठाने प्राध्यापकांना रविवारीही उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी बोलावले होते. पण रविवार असल्यामुळे जवळपास ५ हजारांपैकी फक्त ९३९ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीला आले. प्राध्यापकांची संख्या रोडावल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा वेग रविवारी मंदावला होता. फक्त २४ हजार ३४९ उत्तरपत्रिकांची तपासणी रविवारी पूर्ण झाली. त्यामुळे अजूनही सुमारे ३ लाख २५ हजार १९५ उत्तरपत्रिकांची तपासणी होणे बाकी आहे. १ लाख २५ हजार ३५७ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशनही अजून झालेले नाही.
तपासणी बाकी असलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये २ लाख ६३ हजार ८१५ उत्तरपत्रिका या वाणिज्य शाखेच्या असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. तसेच विधिचा निकालही लागलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून विज्ञान शाखेचा निकाल जाहीर करणार असल्याचे विद्यापीठ सांगत असूनही रविवारी रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. निकालाच्या डेडलाइनला शेवटचे दोन दिवस उरले असताना, शनिवार आणि रविवारी मिळून फक्त छोट्या अभ्यासक्रमांचे निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे लाखो विद्यार्थी तणावाखाली आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अतिआत्मविश्वासाने ३१ जुलै रोजी निकाल जाहीर करू, अशी घोषणा केली आहे. मात्र निकालाची सद्य:स्थिती पाहता हे सर्व निकाल सोमवार, ३१ जुलैला जाहीर होतील, अशी शक्यता दिसत नाही. मात्र हे निकाल सोमवारी जाहीर झाले नाहीत तर १ ऑगस्ट रोजी अधिवेशनात शिक्षणमंत्री तावडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांनी सांगितले.
इतक्या उत्तरपत्रिका
तपासणीचे आव्हान
वाणिज्य
मूल्यांकन - २,६३,८१५
मॉडरेशन - ९७,३०१
विधि
मूल्यांकन - ३१,१४३
मॉडरेशन - ५,६२३
कला
मूल्यांकन - २१,०९७
मॉडरेशन - १०,९१०
मॅनेजमेंट
मूल्यांकन - १,४८१
मॉडरेशन - ७,१९५
विज्ञान
मूल्यांकन - ४,०२३
मॉडरेशन - २,०३७
टेक्निकल
मूल्यांकन - ३,६३६
मॉडरेशन - २,२९१