मुंबई विद्यापीठाचा मृत्यू, निकालांचे श्राद्ध  - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 07:46 AM2017-08-01T07:46:49+5:302017-08-01T07:49:56+5:30

मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाइन चुकली आहे. पूर्वतयारी न करता ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या परीक्षेत नापास झाले आहेत. यावरुन सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.   

Mumbai university result issue | मुंबई विद्यापीठाचा मृत्यू, निकालांचे श्राद्ध  - उद्धव ठाकरे

मुंबई विद्यापीठाचा मृत्यू, निकालांचे श्राद्ध  - उद्धव ठाकरे

googlenewsNext

मुंबई, दि. 1 - मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली 31 जुलैची डेडलाइन चुकली आहे. पूर्वतयारी न करता ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या परीक्षेत नापास झाले आहेत. यावरुन सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरू डॉ.  संजय देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.   
''मुंबई विद्यापीठात ऑनलाइन पेपर तपासणीचा आग्रह कुलगुरू देशमुखांनी धरला होता. विद्यापीठाच्या मॅनेजिंग कमिटीने ऑनलाइन पेपर तपासणीस विरोध करूनही कुलगुरूंनी त्यासाठी हट्ट धरला व निकालांचे श्राद्ध घातले'', अशा बोच-या शब्दांत उद्धव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर टीका केली आहे. 
 
पुढे उद्धव ठाकरे असेही म्हणाले आहेत की, ''संघविचाराचे आहेत म्हणून कुलगुरूंना माफी नाही. त्यांना जावेच लागेल. कुलगुरूंची वकिली करणाऱ्यांच्या जिव्हा झडून जातील व लाखो विद्यार्थ्यांचे तळतळाट त्यांना लागतील. मुंबई विद्यापीठातील अनागोंदीमुळे चार लाख विद्यार्थ्यांच्या जीवनात जे ‘खड्डे’ पडले आहेत त्यावरही कुणी तरी आता ‘‘मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!’’ असे गाणे वाजवायला हरकत नाही!

नेमके काय आहे सामना संपादकीय ?

मुंबई विद्यापीठाचा मृत्यू
राज्य चालविणे म्हणजे एकाच विचाराच्या लोकांनी खुर्च्या उबवणे असे नाही. सध्या सर्वच घटनात्मक पदांवर संघविचाराच्या लोकांच्या नेमणुका सुरू आहेत. केंद्रापासून राज्यापर्यंत त्याच विचारांचे सरकार असल्यावर या गोष्टी होणारच. मात्र अशा नेमणुका करताना संघविचाराबरोबरच क्षमता आणि गुणवत्तेचा विचार अधिक व्हायला हवा. तो जर झाला नाही तर ऐतिहासिक आणि कर्तबगार संस्था कशा मोडीत निघू शकतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबई विद्यापीठात सुरू असलेले अराजक. बिहारमध्ये राजकीय, प्रशासकीय अराजक सुरू असल्याच्या निमित्ताने तेथील सरकार भारतीय जनता पक्षाने पाडले आहे. तोच न्याय भाजप सरकारने मुंबई विद्यापीठाच्या कारभारास लावला तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करून अनागोंदी कारभाराबद्दल दोषी ठरवायला हवे. ज्या संघविचाराच्या महानुभावांनी देशमुख यांना कुलगुरूपदी नेमण्याची राजकीय शिफारस केली त्यांनी लाखो विद्यार्थ्यांचे ‘करीअर’ उद्ध्वस्त केले आहे. मुंबई विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांचे जीव सध्या टांगणीला लागले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष पदवी परीक्षेच्या साधारण सवापाचशे अभ्यासक्रमांसाठी एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल विद्यापीठ कायद्यानुसार जास्तीत जास्त ४५ दिवसांत म्हणजे मेअखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला लागणे अपेक्षित होते, पण ऑगस्ट महिन्याची उघडीप झाली तरी निकाल लागले नाहीत. राज्यपालांनी सर्व निकाल लावण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत देऊनही घोडे पुढे सरकलेले नाही. सर्व महाविद्यालये आठ दिवस बंद ठेवून समस्त शिक्षकवर्ग पेपर तपासणीसाठी जुंपूनही निकाल लागत नसतील तर या

अनागोंदीची जबाबदारी
शिक्षण मंत्री तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंवर तर जातेच, पण इतका बेफिकीर, अकार्यक्षम कुलगुरू नेमणाऱ्या सरकारवरदेखील जाते. नव्या राजवटीत कुलगुरू निवडीचा घोटाळा झाला आहे व तो गंभीर आहे. राज्यपालांच्या नेमणुका या संघविचारक आणि प्रचारकांच्याच झाल्या आहेत. देशात प्रथमच संघविचारक व प्रचारक हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान बनले आहेत, पण निदान पिढी घडवणाऱ्या शैक्षणिक संस्था तरी त्यातून सुटाव्यात व ‘मेरिट’वर या नियुक्त्या व्हाव्यात. संघविचार हा गुन्हा नाही व त्या विचाराने कुणाचे नुकसान होणार नाही. आम्ही तर सरसंघचालकांचेच नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते, पण सध्या मुंबई विद्यापीठाची जी घसरण सुरू आहे ती पाहता सरसंघचालक कुलगुरूंना व त्यांना नेमणाऱ्यांना काठीने फोडून काढतील असे चित्र आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दाणी यांना थातूरमातूर कारणामुळे पदावरून हटवले असले तरी त्या विद्यापीठातील आर्थिक घोटाळे हेच त्यांच्या बडतर्फीचे खरे कारण असावे. बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने अशा नेमणुका होतात तेव्हा त्याची किंमत विद्यार्थ्यांना चुकवावी लागते. डॉ. देशमुख हे संघाच्या रामभाऊ म्हाळगी संस्थेशी संबंधित होते. या एकाच कारणासाठी अनेक सुयोग्य व कर्तबगार उमेदवारांना डावलून त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली असेल तर ही बाब धक्कादायक आहे. निकाल प्रचंड लांबल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे व त्या मुलांच्या संतापाचा केव्हाही भडका उडू शकतो. पुन्हा लांबलेल्या निकालांचे भूत मानगुटीवरून उतरावे यासाठी प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी

वेठबिगारासारखे
राबवले जात आहे. त्यामुळे हा वर्ग सरकारवर नाराज आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी व विद्यापीठातील गोंधळाविरोधात एरवी ‘गोंधळ’ घालणाऱ्या विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनाही गारेगार बसल्या आहेत याचे आश्चर्य वाटते. मुंबई विद्यापीठातील ऑनलाइन पेपर तपासणीतला हा गोंधळ आहे व ऑनलाइन पेपर तपासणीचा आग्रह कुलगुरू देशमुखांनी धरला होता. विद्यापीठाच्या मॅनेजिंग कमिटीने ऑनलाइन पेपर तपासणीस विरोध करूनही कुलगुरूंनी त्यासाठी हट्ट धरला व निकालांचे श्राद्ध घातले. सध्या भाजपात व संघ परिवारात प्रत्येक जण मोदींची कार्यपद्धती पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत असेल तर एकही शैक्षणिक संस्था, विद्यापीठ स्वतंत्र व नीटपणे चालणार नाही. विचारांबरोबर लायकीही असावी लागते. आपापली माणसे घुसवून व बसवून आपण काही लोकांच्या गाडीघोडय़ांची सोय लावू शकतो, पण त्यामुळे लाखो लोकांवर संकटाची कुऱहाड कोसळत असते. नोटाबंदी, जीएसटी निर्णयाचे असेच फटके बसू लागले आहेत व रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांकडे त्याचे उत्तर नाही. रेटलेले व लादलेले निर्णय हेच अराजक घडवीत असतात. मुंबई विद्यापीठाचे वैभवशाली टॉवर झडताना व पडताना दिसत आहे. ज्या विद्यापीठाने अनेक पिढय़ा घडवल्या ते विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालताना दिसत आहे. संघविचाराचे आहेत म्हणून कुलगुरूंना माफी नाही. त्यांना जावेच लागेल. कुलगुरूंची वकिली करणाऱ्यांच्या जिव्हा झडून जातील व लाखो विद्यार्थ्यांचे तळतळाट त्यांना लागतील. मुंबई विद्यापीठातील अनागोंदीमुळे चार लाख विद्यार्थ्यांच्या जीवनात जे ‘खड्डे’ पडले आहेत त्यावरही कुणी तरी आता ‘‘मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!’’ असे गाणे वाजवायला हरकत नाही!

Web Title: Mumbai university result issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.