मुंबई विद्यापीठाचे मानांकन वधारले
By admin | Published: July 10, 2015 03:37 AM2015-07-10T03:37:45+5:302015-07-10T03:37:45+5:30
ब्रीक्स देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने ६८व्या स्थानावरून ५८व्या स्थानावर झेप घेतली आहे. क्वाकारेली सायमंड (क्यूएस) या शैक्षणिक क्षेत्रातील कंपनीतर्फे ब्रिक्स देशांमधील
मुंबई : ब्रीक्स देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने ६८व्या स्थानावरून ५८व्या स्थानावर झेप घेतली आहे. क्वाकारेली सायमंड (क्यूएस) या शैक्षणिक क्षेत्रातील कंपनीतर्फे ब्रिक्स देशांमधील (भारत, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका व ब्राझील) शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१३ साली या यादीत मुंबई विद्यापीठ ६२व्या स्थानावर होते. त्या वेळी विद्यापीठाला ५५.३ गुण मिळाले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या क्रमवारीत ६ स्थानांची घसरण झाली होती. मात्र या वर्षी विद्यापीठाने १० स्थानांनी मुसंडी मारत ५८वे स्थान पटकावले.
क्यूएसच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यापीठाची कामगिरी भरीव दिसते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित कुलगुरू संजय देशमुख म्हणाले, ‘विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन व विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि शाश्वत प्रयत्नांची हे फळ आहे. याच विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे.’