अंमलबजावणीत मुंबईच ठरली अव्वल
By admin | Published: April 29, 2015 02:04 AM2015-04-29T02:04:08+5:302015-04-29T02:04:08+5:30
राज्य शासनाच्या ‘राजीव गांधी जीवनदायी’ आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मुंबई व उपनगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
राहुल कलाल - पुणे
तब्बल ३० आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या ‘राजीव गांधी जीवनदायी’ आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत मुंबई व उपनगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचवेळी पुणे जिल्हा मात्र योजनेच्या अंमलबजावणीत तळाशी असल्याचे चित्र आहे. सोलापूर, नांदेड, अमरावतीसारख्या तुलनेने छोट्या जिल्ह्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.
वैद्यकीय खर्चात भरमसाठ प्रमाणात वाढ झाल्याने गरिबांना असाध्य आजारावर उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी राज्य सरकारने डिसेंबर २०११मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. अवघ्या तीन वर्षांत या योजनेअंतर्गत राज्यात ४ लाख ८१ हजार २६ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचवेळी अत्याधुनिक उपचारासाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालये उभी राहत असलेल्या पुण्यात मात्र या योजनेअंतर्गत
उपचार घेणाऱ्यांची संख्या खूपच
कमी आहे. डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१४ दरम्यान पुण्यात केवळ १४ हजार २२४ रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला.
अहमदनगर, अमरावती, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, रायगड, सोलापूर या जिल्ह्यांनी ही योजना पुण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने राबविली.
जिल्हारुग्णांवर उपचार
मुंबई व उपनगर१,१२,७०६
सोलापूर३४,२२२
नांदेड२९,४५१
ठाणे२४,४९२
अमरावती२४,३९५
रायगड२०,४२९
नाशिक१८,६२७
कोल्हापूर१७,८४७
अहमदनगर१७,२७२
जळगाव१७,०८९
पुणे१४,२२४