जगातील सर्वात लठ्ठ महिला सर्जरीसाठी उद्या येणार मुंबईत
By Admin | Published: February 10, 2017 12:25 PM2017-02-10T12:25:44+5:302017-02-10T12:25:44+5:30
जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद शस्त्रक्रियेसाठी उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांचे वजन 500 किलो आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद शस्त्रक्रियेसाठी उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांचे वजन 500 किलो आहे. अति लठ्ठपणामुळे गेल्या काही वर्षांपासून बिछान्याला खिळून असलेल्या इमान वजन कमी करणा-या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येत आहेत. चर्नी रोडच्या सैफी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येईल.
इजिप्तमध्ये राहणा-या इमान यांना एअरबसच्या विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. इमाम यांच्या शरीराचे आकारमान आणि वजनामुळे त्यांना घेऊन येण्यासाठी विमानामध्येही काही बदल करण्यात आले आहेत. इजिप्तच्या अलेक्झॅन्ड्रिया अल अरब आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानाने उड्डाण केल्यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास विमानाचे मुंबईत लँडीग होईल.
इमान यांना प्रवासी विमानातून आणणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी मालवाहतूक विमानाचा वापर करण्यात येईल. या शस्त्रक्रियेसाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष वॉर्ड बांधण्यात येत आहे. या वॉर्डमध्ये एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम असणार आहे.इमान अहमद यांचं वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामध्ये 7 फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील 7 फूट रुंद असणार आहे.
मुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला ही शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांच्यासोबत विशेष टीम उपस्थित राहणार असून ऑपरेशन झाल्यानंतरदेखील 24 तासांसाठी त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे. स्ट्रोकमुळे इमानचा उजवा हात आणि पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तिला बोलता येत नाही, तिला टाईप-2 डायबेटिस आहे. शिवाय तिला उच्चरक्तदाबाचा त्रास असून, फुप्फुसांचाही त्रास आहे. शस्त्रक्रियेनंतर इमामला सहा महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली इथेच रहावे लागेल.