मुंबईत प्राप्तिकर विभागाचे २०० अधिकारी ठेवणार अवैध व्यवहारांवर बारीक लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:34 AM2019-03-19T07:34:24+5:302019-03-19T07:34:41+5:30
लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाच्या ५० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण २०० अधिकारी मुंबईतील व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.
मुंबई/नागपूर - लोकसभा निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाच्या ५० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण २०० अधिकारी मुंबईतील व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रोख आर्थिक व्यवहार अनधिकृत पद्धतीने होत असल्यास प्राप्तिकर विभाग त्यावर कारवाई करेल, अशी माहिती महासंचालक (अन्वेषण) किशोर व्यवहारे यांनी सोमवारी दिली.
निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल १, जुहू विमानतळ, पवनहंस हेलिपॅड या सर्व ठिकाणी एअर इंटेलिजन्स युनिट कार्यरत करण्यात आले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात २४ तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार किंवा माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. किंबहुना माहिती देणाºयाला आपली ओळख सांगण्याची गरज नाही. आतापर्यंत
दोन जणांनी दूरध्वनीद्वारे याबाबत तक्रार केली आहे, असे व्यवहारे
यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्राप्तिकर विभागाचे मुख्य संचालक सुमंत सिन्हा, आनंद कुमार, उपसंचालक आदित्य प्रभू देसाई, अतिरिक्त संचालक डॉ. संतोष मानकोसकर, अभिनव कुंभार हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विदर्भ-मराठवाड्यात ‘क्यूआरटी’
विदर्भ आणि मराठवाड्यासह इतर विभागांतील २४ जिल्ह्यांत ‘क्यूआरटी’ (क्विक रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाचे प्रधान संचालक ‘इन्व्हेस्टिगेशन’ (विदर्भ-मराठवाडा) जयराज काजला यांनी नागपूरमध्ये दिली. मराठवाडा व विदर्भ क्षेत्रात एकूण सहा विमानतळ आहेत. तेथेही ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ तैनात करण्यात आले आहे.
येथे तक्रार करता येणार
निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहाराची कोणतीही तक्रार करण्यासाठी नागरिक टोल फ्री क्रमांक १८००२२१५१०, दूरध्वनी क्रमांक ०२२२२८२०५६२ व व्हॉट्सअॅप क्रमांक ९३७२७२७८२३ व ९३७२७२७८२४ यावर संपर्क साधू शकतात.