बेस्टच्या संपामुळे मुंबईकर बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:56 AM2017-08-08T06:56:28+5:302017-08-08T06:56:31+5:30

वेतनप्रश्नी तोडगा काढण्यात येत नसल्याने, अखेर बेस्ट कामगारांनी रविवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. या बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांसह आसपासच्या उपनगरातून येणारी चाकरमानी आणि इतर प्रवासी बेहाल झाल्याचे चित्र दिसून आले.

Mumbaikar Behal due to best strike | बेस्टच्या संपामुळे मुंबईकर बेहाल

बेस्टच्या संपामुळे मुंबईकर बेहाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वेतनप्रश्नी तोडगा काढण्यात येत नसल्याने, अखेर बेस्ट कामगारांनी रविवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. या बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांसह आसपासच्या उपनगरातून येणारी चाकरमानी आणि इतर प्रवासी बेहाल झाल्याचे चित्र दिसून आले.
संपाच्या काळात मुंबईच्या रस्त्यावर एकही बेस्ट बस धावली नाही. परिणामी, मुंबईकरांसाठी उर्वरित वाहतूक व्यवस्था तोकडी पडली. याचा विपरित परिणाम म्हणून उर्वरित वाहतूक व्यवस्थेवर ताण आल्याने, एका अर्थाने मुंबापुरीची वाहतूक व्यवस्थाच कोलमडून पडली. संपावर उपाय म्हणून खासगी बसही रस्त्यावर उतरल्या. शिवाय टॅक्सी आणि रिक्षानेही वाहतूक व्यवस्थेला हातभार लावला. मात्र, तुलनेत वाहतूक व्यवस्थेतील फरक कायम राहिल्याने आणि ऐन रक्षाबंधनादिवशी संपाचे हत्यार उपसण्यात आल्याने, मुंबईकरांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागली.
उपनगरांमध्ये घाटकोपर आणि विक्रोळी परीसरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती, पण या परिसरातील नागरिकांना मेट्रोचा पर्यायही उपलब्ध होता. त्यामुळे मेट्रोसुद्धा फुल्ल असल्याचे चित्र दिसत होते, परंतु मेट्रोचा पर्याय असूनही परिसरात अनेक ठिकाणी रस्ते जाम झाले होते. चेंबूरकरांसाठी मोनोचा पर्याय असल्याने, त्यांचे तुलनेने कमी हाल झाले. शिवाय परिसरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवली नाही, परंतु रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
दरम्यान, मालाड पूर्वेकडील रिक्षांची कमतरता भासून येत होती. नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते, तसेच मुख्य मार्गावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होती. बेस्टच्या संपामळे उपनगरातील सर्वच रेल्वेस्थानकांवर गर्दी पाहायला मिळाली. एरव्ही सकाळच्या वेळेला असणारी गर्दी रेल्वेस्थानकांवर दिवसभर होती. दुपारच्या वेळेतही पनवेल, बेलापूर, कर्जत, खोपोलीवरून येणाºया लोकल भरभरून येत होत्या, तर पश्चिम रेल्वेच्या वतीने पिक अवरमध्ये दोन ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. उत्तर मध्य मुंबईत स्कूलबसने वाहतूक करण्यात आली होती. परिणामी, रक्षाबंधननिमित्त बाहेर पडणाºया प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

शेअर रिक्षांचा दिलासा
मानखुर्दमधील अणुशक्तीनगर आगार, ट्रॉम्बे बस डेपोमध्ये निरव शांतता पाहायला मिळाली, याउलट परिसरात मात्र, सर्वत्र आॅटो रिक्षा आणि टॅक्सी दिसत होत्या. मानखुर्दमधील टी जंक्शन परिसरात रिक्षांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवली होती.

एसटीच्या ७३ जादा बस
बेस्ट संपावर गेल्यामुळे लाखो प्रवास हवालदिल झाले. मात्र, परिवहन विभागाकडून रविवारी रात्री उशिरा एसटी महामंडळासह स्कूलबस आणि खासगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली. संपाच्या काळात एसटीच्या वतीने ७३ जादा बस चालविण्यात आल्या. संपकाळात प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी गृहविभागाकडून अधिसूचना काढण्यात आली. अधिसूचनेनुसार प्रवासी वाहतुकीसाठी संपकाळात जादा एसटी सोडण्याबाबत विनंती करण्यात आली. स्कूलबस आणि खासगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली होती. यानुसार, एसटी महामंडळाने कुर्ला-वांद्रे कुर्ला संकूल-मंत्रालय, ठाणे-पनवेल मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय या मार्गावर विशेष फेºया चालवल्या.

प्रवाशांच्या मदतीसाठी एनएमएमटी
नवी मुंबई : बेस्टच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एनएमएमटी उपक्रमाने ५० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. सोमवारी मुंबईसाठी ३५ जादा बसेस पुरविण्यात आल्या होत्या. याशिवाय बस मार्ग क्रमांक २०, ९, ५५ व इतर मार्गांवर १५ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. बेस्टमुळे शहरवासीयांचे हाल होवू नयेत यासाठी विशेष काळजी घेण्यात येत होती.

भाडेवाढ आणि जादा प्रवासी

कांदिवली पूर्वेकडे बेस्टच्या संपाचा बराच परिणाम जाणवत होता. नेहमी लोकांची वर्दळ असलेल्या डेपोत शांतता होती. स्थानकाच्या बाहेर आॅटोरिक्षांची भलीमोठी रांग लागलेली होती. नेहमीप्रमाणे असलेले भाडे यात पाच ते दहा रुपये वाढ करून, नागरिकांकडून जादा पैसे घेतले जात होते, तसेच रिक्षामध्ये वाहनांची मर्यादा ही तीन अधिक एक असून, पाच ते सहा प्रवासी वाहून नेले जात होते.
बोरीवली येथील पूर्वेकडील बेस्ट डेपोजवळ आॅटोरिक्षा, खासगी वाहने, टॅक्सी आदी वाहनांची गर्दी होती. खासगी वाहने शेअरिंगप्रमाणे प्रवासी भाडे नेत होते. काही रिक्षावाले लांबच्या पल्ल्यासाठी जवळचे भाडे नाकारत होते. संपाचा फायदा घेऊन काही वाहनचालकांनी प्रवाशांना खड्डा घातल्याचे निदर्शनास आले.
बेस्टच्या संपामुळे सर्वांना नाईलाजाने आॅटोरिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करावा लागत होता, परंतुमानखुर्द, शिवाजीनगर, घाटकोपर, गोवंडी भागात शेअर रिक्षामध्ये तीन ऐवजी चार किंवा पाच प्रवासी भरून नेले जात असल्याचे पाहायला मिळाले.

उर्वरित सेवांवर ताण आणि वाहतूककोंडी
बेस्ट डेपो आणि आगारांमध्ये सोमवारी बेस्ट कर्मचाºयांच्या संपामुळे शांतता पाहण्यास मिळाली. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट कर्मचाºयांनी संप पुकारल्याने मुंबईकरांचे हाल झाले. बेस्ट बंद असल्याने त्याचा परिणाम इतर वाहतूक सेवांवर झाला. रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, अ‍ॅप बेस टॅक्सी आणि इतर वाहतूक व्यवस्थांवर ताण आला. पूर्व उनगरांमध्ये मानखुर्द, चेंबुर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, पवईमध्ये प्रवाशांचे हाल झाले.
पूर्व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले.

मुंबईकरांनी मानले आभार
खासगी वाहतुकदारांनी देखील संपकाळात महत्वाची कामगिरी बजावली. घाटकोपर वरुन अंधेरीला जाणाºया बेस्टच्या ३४० क्रमांकाच्या बस स्टॉपवरुन खासगी बस वाहतुकदारांनी सेवा दिली. याठिकाणी बेस्टचे भाडे १८ रुपये आहे, यामध्ये अतिरिक्त दोन रुपये आकारुन प्रवाशांकडून २० रुपये आकारले जात होते. मात्र, त्याकरता देखील कोणतीही तक्रार न करता खासगी वाहतुकदारांनी मुंबईकरांकडून खासगी वाहतुकदारांचे आभार मानले जात होते.

संपामुळे शहरातील रस्ते सुसाट : वाहतूक कोंडीला सामोरे जाणाºया मुंबई शहरातील वाहतूक बेस्टच्या संपामुळे सोमवारी सुसाट होती. बहुतेक मुंबईकरांना संपाची कल्पनाच नसल्याने काही बसस्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत प्रवासी दिसले. काही प्रमाणात वाहतूक कोंडी सोडल्यास दुपारपर्यंत शहरातील वाहतुकीने वेग पकडल्याचे चित्र होते. रक्षाबंधनसह कार्यालय गाठण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे बेस्टच्या संपाने मोठ्या प्रमाणात हाल झाले असले, तरी बहुतेक ठिकाणी प्रवाशांनी मीटर टॅक्सीचा वापर शेअर पद्धतीने केल्याचा अनुभवही आला.

स्कूलबसने प्रवासी वाहतूक
अंधेरी पूर्व-पश्चिम आणि कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, बोरीवली या स्थानकांच्या परिसरात स्कूलबसने प्रवासी वाहतूक करण्यात आली होती. परिवहन कार्यालयाच्या आदेशानुसार प्रवासी वाहतूक करण्यात आली असल्याची माहिती, स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.

बेस्ट प्रवाशांच्या जीवावर अ‍ॅप बेस टॅक्सींची चलती
रविवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचा फटका सोमवारी कार्यालयासाठी घराबाहेर पडलेल्या कर्मचाºयांना सर्वाधिक बसल्याचा दिसून आला. रक्षाबंधनानिमित्त २०० बस जादा सोडणारी बेस्ट संपावर गेल्यामुळे भाऊ-बहिणींनी प्रवास करण्यासाठी अ‍ॅप बेस टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले. परिणामी शहरासह उपनगरात अ‍ॅप बेस टॅक्सी बूक केल्यानंतर १५ ते २० मिनिटे वेटिंग करावे लागत होते. एकंदरीत बेस्ट प्रवाशांच्या जीवावर काळी पिवळी टॅक्सीसह रिक्षा चालकांची देखील चलती असल्याचे दिसून आली. बेस्ट संपामुळे वांद्रे, अंधेरी, बोरीवली परिसरात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गेट वे आॅफ इंडिया या ठिकाणीसाठी जाण्यासाठी बेस्ट १० रुपये भाडे आकारते. मात्र संपामुळे टॅक्सी चालक या अंतरासाठी तब्बल ७० ते ८० रुपये आकारत असल्याच्या घटना देखील घडल्या.

चार विशेष ट्रेन
पश्चिम रेल्वेच्या वतीने चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान चार विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. सोमवारी सकाळी १०.०९ मिनिटांनी चर्चगेट येथून पहिली विशेष लोकल सोडण्यात आली. तिकीट स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दी टाळण्यासाठी कांदिवली (१ तिकीट खिडकी) आणि बोरीवली
(२ तिकीट खिडकी) स्थानकांवर तात्पुरत्या स्वरूपाची तिकीट खिडकी उभारण्यात आली होती, तसेच अंधेरीसहभार्इंदर स्थानकात तिकीट खिडकीवरील कर्मचाºयांना डबल शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Mumbaikar Behal due to best strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.