मुंबईकर गाफील!

By admin | Published: July 10, 2015 04:14 AM2015-07-10T04:14:28+5:302015-07-10T04:14:28+5:30

जागरूकता हरवली : दहशतवादी कुठेही ठेवू शकतील बॉम्ब

Mumbaikar confused! | मुंबईकर गाफील!

मुंबईकर गाफील!

Next

टीम लोकमत, मुंबई
मुंबईतली दीड कोटी जनता पोलिसांचे कान, नाक, डोळे बनली तर दहशतवादविरोधी लढ्यात मुंबईला कोणीही पराजित करू शकणार नाही. सदैव जागरूक असलेल्या नागरिकांमुळे दहशतवादी हल्ले थोपवता येतील, या दिशेने पोलीस, दहशतवादविरोधी पथक सातत्याने जनजागृती करीत आहे. प्रत्यक्षात त्याचा मुंबईकरांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. ‘लोकमत’ने केलेल्या मेगा स्टिंग आॅपरेशनमध्ये मुंबईकर स्वत:च्याच धुंदीत वावरताना दिसून आले. या स्टिंग आॅपरेशनमधून मुंबईकर गाफील असल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या स्टिंगनंतर पोलिसांचे कान, नाक, डोळे असलेले मुंबईकर बधिर असल्याचे स्पष्ट झाले.
७/११ बॉम्बस्फोट मालिकेला शनिवारी ९ वर्षे पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हे स्टिंग आॅपरेशन करून मुंबईकर किती सतर्क, संवेदनशील आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’चे आठ प्रतिनिधी चार गटांमध्ये संशयास्पद जाणवतील असे खोके, सॅक, पिशव्या घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट स्थानकावर आले. सोबतच्या खोके, पिशव्यांमध्ये प्रेशर कुकर व अन्य धातूच्या वस्तू होत्या. स्थानकावर प्रवेश करताना सर्वच प्रतिनिधी मेटल डिटेक्टरमधून गेले. चर्चगेटवरल्या डिटेक्टरनी किमान कू-कू असा आवाजतरी केला. मात्र सीएसटीवरचे डिटेक्टर तर मुकेच होते. ते जणू शोभेसाठी लावले असावेत, असे वाटले.
रिपोर्टर्सचे हे चारही गट अत्यंत आरामात, विनारोकटोक चर्चगेट, सीएसटीवरून लोकलमध्ये चढले. दोन गटांनी सीएसटी ते दादरपर्यंत फर्स्ट क्लासमधून (जेन्टस आणि लेडिज) प्रवास केला. तर अन्य गटांनी सीएसटी ते कॉटन ग्रीन, चर्चगेट ते महालक्ष्मी असा प्रवास केला. प्रत्येक गटातल्या एका प्रतिनिधीने आपापली बॅग, खोके, पिशवी रॅकवर ठेवली. आसपासच्या प्रवाशांना ही वस्तू माझी आहे, याची खात्री करून दिली. काही स्थानकांनंतर ती वस्तू रॅकवर तशीच ठेवून सर्वांसमोरून तो रिपोर्टर लोकलमधून सरळ उतरून गेला. मात्र कोणाही प्रवाशाच्या तोंडावरची माशी हलली नाही. ना कोणी संशय व्यक्त केला. जो-तो आपल्या मोबाइलमध्ये नाक खुपसून बसलेला होता. कोणी लोकलमध्ये चढल्या-चढल्याच ढाराढूर निद्रिस्त झाले. तर काही खिडकीतून बाहेर बघण्यात मश्गुल होते. पुढे दोन ते तीन स्थानके गेल्यानंतर त्याच डब्यात बसलेले ‘लोकमत’चे दुसरे प्रतिनिधी आधी ठेवलेल्या वस्तू घेऊन लोकलबाहेर पडले. त्या वेळीदेखील कोणीही त्यांना हटकले नाही. ७/११ बॉम्बस्फोट मालिकेत सात लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. चर्चगेटला लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात बॉम्ब घेऊन चढलेले अतिरेकी मध्येच अशाच प्रकारे गायब झाले होते. तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्याच लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्यांनी वरखाली पाहण्याची साधी तसदीही घेतली नव्हती.

Web Title: Mumbaikar confused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.