मुंबईकर थंडीने कुडकुडले
By admin | Published: December 23, 2015 12:37 PM2015-12-23T12:37:14+5:302015-12-23T12:37:14+5:30
गुलाबी थंडीची सवय असलेल्या मुंबईकरांना सध्या कुडकुडणा-या, बोच-या थंडीचा सामना करावा लागत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - गुलाबी थंडीची सवय असलेल्या मुंबईकरांना सध्या कुडकुडणा-या, बोच-या थंडीचा सामना करावा लागत आहे. मागच्या दोन दिवसात मुंबईत किमान तापमानात कमालीची घसरण झाली आहे. बुधवारी पहाटे मुंबईत तापमानाचा पारा ११.६ अंश सेल्सिसपर्यंत खाली आला होता.
मुंबईच्या इतिहासात आतापर्यंत तिस-यांदा इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९४९ मध्ये मुंबईत १०.६ अंश सेल्सिअस तर, २०११ मध्ये ११.४ अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली होती. बुधवारी सांताक्रूझमध्ये ११.६ अंश तर, कुलाबा येथे १७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वा-याच्या प्रभावामुळे मुंबईसह राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. समुद्रावरुन वाहणा-या वा-याच्या प्रभावामुळे उपनगराच्या तुलनेत शहरामध्ये थंडीचा कडाका थोडा कमी प्रमाणात जाणवला.
एरवी मुंबईमध्ये घरातील पंखे कधी बंद होत नाहीत. मात्र मंगळवारी रात्री बहुतांश घरांमधील पंखे बंद होते. सकाळच्या डयुटीला निघणा-यांना अंगावर स्वेटर घालून बाहेर पडावे लागले.