मुंबईकर तापाने फणफणले

By admin | Published: September 3, 2016 06:11 AM2016-09-03T06:11:29+5:302016-09-03T06:11:29+5:30

आॅगस्ट महिन्यात सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या लपंडावाचा परिणाम थेट मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. मुंबईत एका महिन्यात विविध तापांचे १० हजारहून अधिक रुग्ण आढळले

Mumbaikar froth | मुंबईकर तापाने फणफणले

मुंबईकर तापाने फणफणले

Next

मुंबई : आॅगस्ट महिन्यात सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या लपंडावाचा परिणाम थेट मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. मुंबईत एका महिन्यात विविध तापांचे १० हजारहून अधिक रुग्ण आढळले असून लेप्टोमुळे एका १७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. २०१६ मधील लेप्टोचा हा सहावा बळी आहे.
जुलैमध्ये जोरदार पडणाऱ्या पावसाने आॅगस्ट महिन्यात थोडीफार विश्रांती घेतली होती. त्यामुळे वातावरणात सतत बदल होत होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात लेप्टोस्पायरोसिसने डोके वर काढले होते. त्यामुळे यंदा महापालिका लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी सतर्क होती. लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी कुर्ला पश्चिम येथील देवशी पत्रा चाळीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाला लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली होती.
हा मुलगा घाऊक व्यापाऱ्याकडे डिलीवरी बॉय म्हणून काम करत होता. त्यामुळे या मुलाला रोज मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी या भागांत जावे लागायचे. १० आॅगस्टला या मुलाला थंडीताप आला आणि त्याला अशक्तपणा जाणवू लागला. या मुलाने खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. १३ आॅगस्टला या मुलाची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, २१ आॅगस्टला या मुलाचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये आॅगस्टपर्यंत १८ जणांचा लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)

तापाच्या रुग्णांमध्ये वाढ
तापाचे तब्बल ९ हजार ३७ रुग्ण आॅगस्ट महिन्यात आढळून आले होते. तर मलेरियाचे १ हजार १० रुग्ण आढळले होते. डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. एका महिन्यात १०६ रुग्ण आढळून आले आहेत.

घ्या विशेष काळजी!
१ ते ३१ आॅगस्ट दरम्यान डेंग्यूचे १ हजार ६७० संशयित रुग्ण आणि लेप्टोस्पायरोसिसचे ४२८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आॅगस्ट महिन्यात अधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पाऊस कमी झाला तरीही आजारांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.

आॅगस्ट महिन्यातील आकडेवारी
आजार रुग्ण
ताप ९०३७
मलेरिया १०१०
लेप्टोस्पायरोसिस (निश्चित) ५३
डेंग्यू (निश्चित)१०६
स्वाइन फ्लू ०
गॅस्ट्रो ९००
कावीळ (अ, ई)१३३

Web Title: Mumbaikar froth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.