सायकल रेसमध्ये मुंबईकर अव्वल

By admin | Published: June 13, 2016 04:11 AM2016-06-13T04:11:43+5:302016-06-13T04:11:43+5:30

सायकलिंग स्पर्धेत मुंबईच्या ओमकार जाधवने गतविजेत्या अक्षय मोयेला मागे टाकत प्रथमच प्रो स्टार बाइक्स मुंबई अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धा जिंकली

Mumbaikar tops in cycle race | सायकल रेसमध्ये मुंबईकर अव्वल

सायकल रेसमध्ये मुंबईकर अव्वल

Next


ठाणे : पावसाच्या सरींसोबत झालेल्या सायकलिंग स्पर्धेत मुंबईच्या ओमकार जाधवने गतविजेत्या अक्षय मोयेला मागे टाकत प्रथमच प्रो स्टार बाइक्स मुंबई अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धा जिंकली. तसेच महिला गटात मुंबईच्याच मधुरा वायकरने बाजी मारली.
ठाणे जिल्हा सायकलिंग संघटना, मुंबई शहर सायकलिंग संघटना आणि मुंबई उपनगर सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या स्पर्धेला लोकपुरम स्कू ल येथून सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओमकारसमोर गतविजेत्या अक्षय मोयेसह यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या धीरेन बोत्राचे तगडे आव्हान होते. धीरेनने ओमकारला मागे टाकत ही शर्यत प्रथम पूर्ण केली; पण आधी ताकीद दिलेली असतानाही, त्याने हात सोडून आणि पाय उंचावत धोकादायक पद्धतीने अंतिम रेषा पार केली. यामुळेच धीरेनला पंचांनी बाद ठरवल्याने त्याला या स्पर्धेच्या विजेतेपदावर पाणी सोडावे लागले. संभाव्य विजेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असल्याने धिरेनला नियमाचे उल्लंघन न करण्याची ताकीद दिली होती. त्यामुळे १ तास १५ मिनिटे ४४ सेकंदांत ५० किमीचे अंतर पार करणाऱ्या ओमकारला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. ओमकारपाठोपाठ मेहेर्झाद इराणी दुसऱ्या स्थानावर राहिला. गतविजेत्या अक्षय मोयेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या गटामध्ये मुंबईच्या अनुभवी मधुरा वायकरने अव्वल स्थान पटकावले. मधुराने इतर सायकलपटूंना एक ते दोन किलोमीटर अंतराने मागे टाकत ही स्पर्धा सहज जिंकली. तिला ३४ किमी अंतर पार करण्यासाठी ३५ मि. ३० सेकंद इतका वेळ घेतला. तर, पूजा कश्यप दुसऱ्या आणि प्रियंका टक्कर तिसऱ्या स्थानावर राहिली. १० वर्षांखालील मुलांच्या गटात शौर्य मकवाना याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १६ वर्षांखालील गटात विजयी सिद्धार्थ दवंडे याला फोरम्याट सायकल पारितोषिक म्हणून देण्यात आली. (प्रतिनिधी)
>स्पर्धेचा गटनिहाय निकाल
मुले १० वर्षांखालील (३ किमी) : शौर्य मकवाना (६.३३ मिनिटे), हर्ष गुप्ता, विहान वेंगुर्लेकर.
मुले १६ वर्षांखालील (६ किमी) : सिद्धार्थ दवंडे (१०: १७ मिनिटे), आयुष पंडूर, सिद्धेश शर्मा.
एम टी बी नोविसेस पुरु ष (१७ किमी) : अमर पटेल (३०: १७ मिनिटे), जितेन मोहनन, ओमकार जंगम.हायब्रीड नोविसेस पुरु ष (३४ किमी) : रोनित व्होरा (५७. ४९ मिनिटे) सुशील तिवारी, नीरजकुमार.
रोड नोविसेस (३४ किमी) : शाकिब शेख (५१: १४ मिनिटे), मिर्झा बेग, मनीष नंबियार.
अशोक खळे
यांचा गौरव
आंतरराष्ट्रीय सायकलपटू आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेते ज्येष्ठ सायकलपटू अशोक खळे यांचा यावेळी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे प्रदान करुन संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.

Web Title: Mumbaikar tops in cycle race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.