मुंबईकर संभ्रमावस्थेत!

By Admin | Published: July 2, 2017 06:54 AM2017-07-02T06:54:03+5:302017-07-02T06:54:03+5:30

देशात शुक्रवारी रात्री १२ वाजता कर प्रणालीत एक ऐतिहासिक बदल घडून आला. गेल्या आठवड्याभरापासून ‘जीएसटी’ हा शब्द

Mumbaikaracabasthasthaya! | मुंबईकर संभ्रमावस्थेत!

मुंबईकर संभ्रमावस्थेत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात शुक्रवारी रात्री १२ वाजता कर प्रणालीत एक ऐतिहासिक बदल घडून आला. गेल्या आठवड्याभरापासून ‘जीएसटी’ हा शब्द सर्वत्र ऐकू येत होता. टीव्ही चॅनेलपासून कॉलेजचा कट्टा ते गल्लीबोळावरही याचीच चर्चा रंगली होती. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत जीएसटीचा काय बदल दिसणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. प्रत्यक्षात रात्री १२ वाजता जीएसटी लागू झाला. पण पहिल्याच दिवशी मुंबईत गडबड गोंधळच दिसून आला. व्यापारी, दुकानदार, तरुण आणि गृहिणीही जीएसटीबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र दिसून आले. याच ‘जीएसटी’विषयी जाणून घेतल्या मुंबईकरांच्या या प्रतिक्रिया.


सरकारला उशिरा शहाणपण सुचले
आधीच्या सरकारने जीएसटी आणण्याचा घाट घातला होता, तेव्हा आताच्या सरकारमधील नेत्यांनीच त्याला विरोध केला होता. त्या वेळी मोदी सरकारमधील आताच्या नेत्यांच्या मते, ‘जीएसटी’ करप्रणाली देशाला खड्ड्यात घालणार असे होते. परंतु उशिरा का होईना, सरकारला शहाणपण सुचले. काँगे्रस सरकारच्या काळात जीएसटीला विरोध केला नसता तर आतापर्यंत भारताचा आर्थिक विकासदर खूप वाढला असता. जीएसटी लागू झाल्यामुळे देशाचा आर्थिक विकासदर तीन ते चार टक्के वाढेल, अशी अपेक्षा आहे. शासनाने घरांच्या किमती कमी होतील, असा दावा केला असला तरी तो किती खरा आहे, हे कालांतराने स्पष्ट होईल.
- वर्षा विद्या विलास, सरचिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य


देश महासत्ता बनेल
सामान्य नागरिकांना जीएसटीचा चांगला फायदा होणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांना अनेक माध्यमातून कर भरावा लागत होता. पण आता जीएसटीमुळे त्यांचे काम सोपे झाले. आमच्यासारख्या व्यापाऱ्यांपासून ते फेरीवाल्यापर्यंत प्रामाणिकपणे कायद्याला साथ दिली, तर भ्रष्टाचार कमी होतील. देशाची प्रगती लवकर होईल आणि आपला देश महासत्ता बनेल.
- विनोद शहा, दी न्यू दादर स्टोअर्स, दादर

औषधोपचार होणार स्वस्त
जीएसटी लागू केल्यानंतर आरोग्य क्षेत्राला त्याचा अधिक फायदा होणार आहे. कारण, जीएसटीमुळे औषधोपचार स्वस्त होणार असल्याने गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या करामुळे रुग्णालयातील उपचार आणि औषधांचा खर्च नक्कीच कमी होणार आहे. तसेच स्टेण्टच्या किमती एकसमान झाल्या आहेत. त्याचबरोबरीने आता हृदयविकाराची पॅकेजसही कमी होतील. फक्त आरोग्य विम्याचा हफ्ता जीएसटीमुळे वाढणार आहे. आधी आरोग्य विम्यावर १५ टक्के कर होता, आता १८ टक्के भरावे लागणार आहेत.
- डॉ. विजय सुरासे, हृदयरोग तज्ज्ञ

सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करावे
‘एक देश एक कर’ ही संकल्पना देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावेल. आता देशात एखाद्या वस्तूची किंमत एकच राहणार आहे. महिलांसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनना जीएसटी लागू होणार आहे. हे महागल्यामुळे महिलांना याचा फटका बसणार आहे. सरकारने याचा पुनर्विचार करून त्याला जीएसटीमधून वगळले पाहिजे. जीएसटीमुळे महागाई कमी होईल. जीएसटीमुळे जकातीसाठी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा बंद होणार आहेत. त्यामुळे इंधनाची बचत होऊन, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
- सुभाष मराठे, संस्थापक-अध्यक्ष, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना

इंधनाचा दर कमी होईल
‘जीएसटी’मुळे सर्व राज्यांत वस्तूंच्या किमती सारख्याच राहतील. सरकारला आता सर्वांकडून एकसारखाच कर मिळेल. त्यामुळे आर्थिक स्तर उंचावेल. जकात कर रद्द झाल्यामुळे वाहतूककोंडी कमी होईल. त्यामुळे इंधनाचा खर्च कमी झाल्यामुळे कंपन्या वस्तूंचा दर कमी लावतील. हॉटेलमधील सेवांवरील कर सर्वांना सारखे पाहिजे होते.
- सुनीता गायकवाड, गृहिणी, घाटकोपर

बिल करताना अडचणी
जीएसटी लागू झाला. पण कर आकारणी कशी करायची याबाबत स्पष्टता नाही. तसेच बिल कसे बनवायचे याविषयी पूर्ण माहिती नसल्याने औषध विक्रेते संभ्रमात होते. आज औषध विक्री केल्यावर बिल तयार करण्यात आले. पण हे बिल १०० टक्के बरोबर आहे का, याविषयी कोणालाच नक्की माहिती नाही. कारण, सरकारने जीएसटी लागू करताना औषध विक्रेत्यांना कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.
- प्रसाद दानवे, रिटेल अ‍ॅण्ड डिसपेन्सिंग केमिस्ट असोसिएशन


आम्ही धंदा कसा करायचा?
जीएसटीनुसार गिरणीत कपड्यावर ५ टक्के कर लावून तो घाऊक विक्रेत्याला विकला गेला. पुन्हा घाऊक विक्रेता किरकोळ (रिटेलर) व्यापाऱ्यांना ५ टक्के कर लावून तोच कपडा देणार. मात्र आम्ही जेव्हा मार्केटमध्ये हा कपडा विकणार तर ग्राहक आमच्याकडून भाव कमी करूनच मागणार. म्हणजे आम्ही ५ टक्के कर भरून एखादी वस्तू १०५ रुपयांना विकत घेणार. मात्र ग्राहक तीच वस्तू ८०/९० रुपयांना मागणार. जर ती वस्तू त्या किंमतीला विकली तर माझे नुकसानच आहे.
- हिम्मतराम चौधरी, अध्यक्ष, श्री शिवशक्ती सोसायटी व्यापारी संघटन, साईनाथ मार्केट

परराज्यात शाखा वाढविणे सोपे
जीएसटीमुळे विक्रीवर मोठा परिणाम होणार आहे. विक्रीचे प्रमाण कमी होईल. पुढचे किमान तीन महिने या परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यानंतर परिस्थिती स्थिर होईल. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू महागणार आहेत. आधीच महागड्या वस्तू अधिक महाग होतील. विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होतील. या प्रक्रियेला काही दिवस लागतील. परंतु, वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पण जीएसटीमुळे आम्हाला विविध राज्यांत व्यापार करणे आणि शाखा वाढवणे सोपे होईल.
- आलोक शाह, शाखा व्यवस्थापक,
कोहिनूर टेलिव्हिडीओ, दादर

सरकारने मूलभूत वस्तू आणि लक्झरी वस्तू असे विभाजन करून वस्तू व सेवा कर आकारला आहे. जीएसटी हा आधीच्या करापेक्षा खूप चांगला असून कळायला सोपा आहे. सगळ्या वस्तूंचा भाव वाढेल, अशी लोकांच्या मनात भीती होती,पण असे काही झाले नाही.
- समता महाजन,
गृहिणी, गोरेगाव

जीएसटीविषयी अधिक स्पष्टता नाही, त्यामुळे संभ्रमात आहे. परंतु वेगवेगळे कर भरण्यापेक्षा एक कर प्रणाली नक्कीच उपयुक्त ठरेल. जीवनावश्यक वस्तूंवरील कर बंद केल्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल.
- आशा शेंडे, गृहिणी, अंबरनाथ

जीएसटी म्हणजे काय हे मला माहीत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही. मुळात जीएसटी काय आहे हे माध्यमातील लोकांनी सांगितले पाहिजे. याबद्दल माझ्या सी.ए.लासुद्धा काही माहिती नाही.
- प्रिन्स टेलर, व्यापारी, घाटकोपर

सरकारचा जीएसटी लागू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबद्दल सरकारचे कौतुक करायला हवे. जीएसटीमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. देशातील ही सर्वात मोठी अर्थक्रांती म्हणावी लागेल.
- कृतिका धनावडे,
गृहिणी, घाटकोपर

जीएसटीने जर देशात सकारात्मक बदल घडत असतील, तर फार चांगले आहे. त्याचबरोबर कमी करामुळे जर वस्तूची किंमत कमी होण्यास मदत होईल. जीएसटीचे पडसाद भविष्यात दिसून येतीलच, पण सध्या तरी जीएसटीचे स्वागत.
- वैशाली शेवाळे,
गृहिणी, वरळी

माझ्यानुसार, जीएसटी हा फक्त देखावा आहे. जीएसटीमुळे कर कमी होईल, पण किमती वाढतील. विद्युत उपकरणांवर २८ टक्के कर आहे. पण याने किमतीवर परिणाम होणार नाही. तर सेवा कर हा कमी होणार आहे. जीएसटीमुळे आमच्या व्यापारी वर्गाचे कागदी काम वाढणार आहे. ६ तारखेपासून नवीन साठा भरणार आहे. घाऊक विक्रेत्याकडून ज्या किमतीला उपकरणे मिळतील त्यानुसार किरक ोळ विक्रेते किंमत ठरवतील.
- चंपालाल खुराना, सोना टीव्ही सेंटर, लोअर परेल

Web Title: Mumbaikaracabasthasthaya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.