मुंबईकरांनो, सुरक्षारक्षक ठेवताना सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:39 AM2017-08-02T04:39:53+5:302017-08-02T04:40:14+5:30
इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेला सुरक्षारक्षकच चोर बनत असल्याचे नवघर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले. या सुरक्षारक्षकांची टोळीच असल्याचा संशय पोलिसांना आहे.
मुंबई : इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेला सुरक्षारक्षकच चोर बनत असल्याचे नवघर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले. या सुरक्षारक्षकांची टोळीच असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामध्ये वृद्ध असल्याचा फायदा उठवून सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवायची. त्यानंतर १५ ते २० दिवस काम करून झाल्यानंतर अन्य साथीदारांच्या मदतीने इमारतीतील बंद घराची घरफोडी करून पसार व्हायचे अशी त्यांची कार्यपद्धती. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशाच टोळीतील दुकलीला नवघर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मुंबईत अशा प्रकारे १४हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
मुलुंड पूर्वेकडील शिल्पी सोसायटीत बँक मॅनेजर असलेले नंदकुमार राणे (५८) त्यांच्या पत्नीसह राहतात. १४ जून रोजी ते कामावर गेले असताना घरातून दागिन्यांसह ९ लाख ८६ हजार किमतीचा ऐवज चोरीला गेला. याबाबत नवघर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. तपासात इमारतीचा वृद्ध सुरक्षारक्षक संतोष कुमार आणि त्याचा मुलगा अजित गायब असल्याचे समोर आले. त्यांची माहिती गोळा करताना परिसरातील वडापाववाल्याच्या फोनवरून संतोषने फोन केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या मोबाइल क्रमांकावरून शोध सुरू केला. तेव्हा त्यांची ओळख पटली. ते उत्तर प्रदेशातील असून, त्यांची नावे गौरीशंकर चौरसिया व विकास उर्फ राजा अनिल सिंग अशी होती. दोघांनाही अटक करत त्यांच्याकडून ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुरक्षारक्षक नेमताना काळजी घ्या...-
सुरक्षारक्षकाची संपूर्ण माहिती घेऊनच त्याला नोकरीस ठेवावे. त्याच्या वागणुकीत संशय आल्यास त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा. विशेषत: वृद्ध सुरक्षारक्षक नेमताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
विकासविरुद्ध १४ गुन्हे : विकासविरुद्ध डी.एन. नगर, कांदिवली, गोरेगाव, ओशिवारा येथील घरफोडीच्या गुन्ह्यांत त्याचा शोध सुरू आहे. तर तपासात विलेपार्ले, गोरेगाव, कांदिवली, डी.एन. नगर परिसरात त्याने १४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे.