मुंबईकरांच्या तक्रारी यायला नकोत!
By admin | Published: June 18, 2017 01:09 AM2017-06-18T01:09:09+5:302017-06-18T01:09:09+5:30
महापालिकेचे सर्व दावे फोल ठरवित, मान्सूनपूर्व पावसातच मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबते, हे दरवर्षीचे चित्र. मात्र, या वेळी सेनेचे पहारेकरी बारीक लक्ष ठेवून आहेत.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेचे सर्व दावे फोल ठरवित, मान्सूनपूर्व पावसातच मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबते, हे दरवर्षीचे चित्र. मात्र, या वेळी सेनेचे पहारेकरी बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशी सक्त ताकीद ‘मातोश्री’ बंगल्यावर शनिवारी सकाळी पार पडलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत, शिवसेना पक्षप्रमुखांनी सर्व नगरसेवकांना दिली आहे.
गेल्या सोमवारी मान्सूनपूर्व पावसानेच काही भागांमध्ये पाणी तुंबले होते. किंग्ज सर्कल, माटुंगा आणि दादर या भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिक होते. या प्रकरणी पालिकेने संचालक (अभियांत्रिकी) लक्ष्मण व्हटकर यांना नोटीस बजावली आहे. मात्र, ठाकरे यांनीही नगरसेवकांना आपापल्या प्रभागात सतर्क राहण्याचे आदेश या बैठकीतून देत, सर्वच नगरसेवकांची झाडाझडती घेतली.
युती तोडून स्वबळावर महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतरही भाजपाचे सत्तेचे गणित फसले. मात्र, सत्ताधारी शिवसेनेच्या नाकात दम आणण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. पहारेकऱ्याच्या भूमिकेत काम करणाऱ्या भाजपाने नालेसफाईवरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास भाजपाला आयती संधी मिळणार असल्याने, शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. याचे पडसाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ बंगल्यावर बोलाविलेल्या शनिवारच्या नगरसेवकांच्या बैठकीत उमटले.
उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतली. गेल्या सोमवारी मान्सूनपूर्व पावसानेच काही भागांमध्ये पाणी तुंबले होते. किंग्ज सर्कल, माटुंगा आणि दादर या भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रमाण अधिक होते. या प्रकरणी पालिकेने संचालक (अभियांत्रिकी) लक्ष्मण व्हटकर यांना नोटीस बजावली आहे. मात्र, ठाकरे यांनीही नगरसेवकांना आपापल्या प्रभागात सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत.
विकास आराखड्याचा अभ्यास करा...
मुंबईचा विकास आराखडा गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. २०१४ ते २०३४ या २० वर्षांच्या आराखड्याच्या मसुद्यावर अनेक वेळा चर्चा झाली. मात्र, पहिला आराखडा स्थगिती होऊन सुधारित आराखडा सादर होऊनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांनी दोनदा मुदत वाढवून घेतली, परंतु अभ्यास केलाच नाही. याचीही ठाकरे यांनी दखल घेत, विकास आराखड्याचा अभ्यास करा, चर्चा करा आणि सभागृह नेत्यांमार्फत सूचना मांडा, असे आदेश दिले.
टोलवरून कानउघडणी...
राज्यातील सर्व टोल नाक्यांवर नगरसेवकांच्या वाहनांना विनामूल्य प्रवेश देण्याची ठरावाची सूचना शिवसेनेचे नगररसेवक तुकाराम पाटील यांनी केली होती. मात्र, याचे सर्वत्र पडसाद उमटून शिवसेनेचे हसे झाले. या प्रकरणी ठाकरे यांनी शनिवारी नगरसेवकांची चांगलीच कानउघडणी केली. ठरावाच्या सूचना थेट पालिकेच्या चिटणीस खात्याकडे देण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करा, सभागृह नेते यशवंत जाधव यांना दाखवा, असे पक्षप्रमुखांनी नगरसेवकांना बजावले.