मुंबईकरांचे ‘मेघा’हाल, रेल्वेसह रस्ते वाहतूक विस्कळीत, मुंबई 'ऑफ द ट्रॅक'वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:04 AM2017-09-20T07:04:41+5:302017-09-20T07:04:48+5:30
मुंबई : रेल्वे म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. तिच्यामुळेच मुंबईकरांचे जीवन वेगाने धावत असते. परंतु मंगळवारी मुसळणार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे ‘मेघा’हाल झाले. आणि सतत ‘आॅन द ट्रॅक’ असणारी मुंबई ‘आॅफ द ट्रॅक’ झाली.
मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळपर्यंत चांगलाच जोर धरला. दुपारपासूनच मध्य रेल्वेची जलद वाहतूक वगळता धिम्या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे विलंबाने सुरू होती. दरम्यान, पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढू लागला आणि विलंबाने धावू लागलेल्या लोकलमुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली.
पावसामुळे रेल्वे वाहतुकीप्रमाणेच रस्ते वाहतुकीलाही ब्रेक लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमातासह सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील शीतल आणि कमानी सिग्नल येथील सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्यामुळे मुंबईकरांना घर गाठणे कठीण झाले.
सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह कुर्ला-अंधेरी मार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मरोळसह अंधेरी येथे वाहतूक कोंडी झाली होती. दादरसह माहीम आणि लोअर परळ येथेही वाहतूक कोंडी झाली होती. महालक्ष्मी येथेही वाहतूक कोंडी झाली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने वाहनांचा वेग कमी झाला होता. वाढत्या वाहतूक कोंडीने मुंबईकरांच्या मनस्तापात भर पडली.
>रांगा वाहनांच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता येथे पाणी साचले. यासह मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक सखल ठिकाणे पाण्याखाली गेली होती. परिणामी, या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब
रांगा लागल्या होत्या. ठिकठिकाणची वाहतूक कोंडी आणि साचलेले पाणी यातून मार्ग काढताना मुंबईकरांची चांगलीच दमछाक झाली.
शिवसेना भवनाजवळील हॉटेल मनोहर येथील झाड कोसळल्याने शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. विमानांची उड्डाणे सरासरी
२० मिनिटे उशिराने होती. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे अनेक प्रवाशांनी मेट्रोकडे धाव घेतली. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवरही प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र होते.