मुंबईकरांना आता उन्हाचे चटके; कमाल तापमान वाढणार तर विदर्भाला पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:03 AM2020-03-11T04:03:31+5:302020-03-11T04:04:31+5:30
११ ते १४ मार्चदरम्यान उत्तर समुद्रकिनारी ४० ते ४५ वेगाने समुद्री वारे वाहतील.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी धुळवड साजरी होत असतानाच मंगळवारी मुंंबापुरीचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असले तरी आता मुंबईमधील उन्हाळा वाढण्याची चिन्हे आहेत. १५ ते १६ मार्च रोजीच्या आसपास मुंबईचे कमाल तापमान वाढण्याची शक्यता असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना खऱ्याखुºया उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
११ ते १३ मार्चदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १४ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ११ आणि १२ मार्च रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, २० अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, ११ ते १४ मार्चदरम्यान उत्तर समुद्रकिनारी ४० ते ४५ वेगाने समुद्री वारे वाहतील. आणि किनारा खवळलेला राहील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हवेची गुणवत्ता उत्तम
दरम्यान, कधी नव्हे ते मुंबईतल्या हवेची गुणवत्ता मंगळवारी उत्तम नोंदविण्यात आली आहे. कुलाबा, भांडुप येथील हवा समाधानकारक नोंदविण्यात आली आहे.