मुंबईकरांची गर्दी, उद्योजकांची रीघ

By admin | Published: February 14, 2016 01:57 AM2016-02-14T01:57:25+5:302016-02-14T01:57:25+5:30

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा परिसर शनिवारी मेक इन इंडिया सप्ताहामुळे अक्षरश: मंतरला होता. मेक इन इंडिया सेंटरकवर सकाळपासूनच सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींची

Mumbaikar's rush, entrepreneur rides | मुंबईकरांची गर्दी, उद्योजकांची रीघ

मुंबईकरांची गर्दी, उद्योजकांची रीघ

Next

- गौरीशंकर घाळे,  मुंबई

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा परिसर शनिवारी मेक इन इंडिया सप्ताहामुळे अक्षरश: मंतरला होता. मेक इन इंडिया सेंटरकवर सकाळपासूनच सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींची लगबग सुरु होती. सेंटरकडे येणा-या प्रत्येक रस्त्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. तर, झेब्रा क्रॉसिंगपासून लेन मार्किंगसह प्रत्येक रस्ता देशीविदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुसज्ज होता.
मेक इन इंडिया सेंटरवरील २५ भव्य दालनांत विविध क्षेत्रांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. भारत इलेक्ट्रिकल्स, जेसीबी, इन्फोसिस, युफ्लेक्?स, ओएनजीसी, इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. वेगवेगळ्या राज्यांनी दालने थाटली आहेत. गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांच्या दालनांत औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला आहे. विस्तीर्ण मैदानावर पसरलेल्या स्टॉलना भेटी देणे शक्य व्हावे म्हणून ई-वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल ५० पर्यावरणपूरक ई-वाहने आणि ई-रिक्षा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
मेक इन इंडिया सेंटरवर पुढील आठवडाभर विविध राज्यांच्या परंपरांचे दर्शन होणार आहे. शनिवारी पंजाबच्या कलाकारांनी भांगडा, ओडिशाच्या कलाकारांनी बिदई नृत्याविष्कार सादर केले. पारंपारिक वेशभूषेती कलाकार उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सेटंरच्या उद्धघाटनासाठी पंतप्रधान येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. भारत नगरपासून ‘एनएसई’मार्गे अंतर्गत मार्गावरुन वाहतूक वळवण्यात आली. बीकेसीतील अग्निशमन दल केंद्राच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सेंटरपासून ही जागा दूर असल्याने पाहुण्यांना भरउन्हात पायपीट करावी लागली.
मेक इन इंडिया सेंटरमध्ये प्रवेश देण्यावरुन दुपारपर्यंत गोंधळाची स्थिती होती. पंतप्रधांनांच्या सुरक्षाव्यवस्थेमुळे प्रवेशपत्र असूनही प्रवेश नाकारला जात होता. विविध यंत्रणातील समन्वयाचा अभाव प्रकर्शाने जाणवत होता. दुपारपासूनच लोकांनी गर्दी केल्याने गेट नंबर ३ वरील रांग एक किलोमीटरपर्यंत लांबली होती. भर उन्हातही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गैरसोय झाली तरी काही हरकत नाही, देशासाठी महत्वाचा कार्यक्रम आहे. पहिला दिवस आहे, सुधारणा होईल, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.

मोदींच्या हस्ते उद्घाटन
देशातील परकीय गुंतवणूक वाढावी आणि उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या ‘मेक इन इंडिया सेंटर’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या या सोहळ्यास पोलँड, फिनलँड आदी देशांच्या पंतप्रधानांसह जगभरातील मान्यवर उद्योजकांनी उपस्थिती लावली.
मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मेक इन इंडियाकडे पाहिले जाते. मेक इन इंडिया सप्ताहाच्या आयोजनाचा पहिला मान मुंबईला मिळाला. १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत हा सप्ताह राबविण्यात येणार असून, त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर भव्यदिव्य मेक इन इंडिया सेंटर उभारण्यात आले आहे. मोदींच्या हस्ते सकाळी या सेंटरचे उद्घाटन झाले.
या वेळी फिनलँडचे पंतप्रधान जुहा सिपीला, पोलँडचे पहिले उपपंतप्रधान प्रो. पिओत्र ग्लिन्स्की यांच्यासह राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी मान्यवरांसह ‘मेक इन इंडिया सेंटर’मधील विविध दालनांना भेटी देऊन पाहणी केली.

Web Title: Mumbaikar's rush, entrepreneur rides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.