मुंबईकरांना लवकरच पेंग्विनचे दर्शन
By admin | Published: February 27, 2017 01:45 AM2017-02-27T01:45:18+5:302017-02-27T01:45:18+5:30
भायखळा येथील राणीच्या बागेत दाखल झालेल्या पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना आता लवकरच होणार आहे.
मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेत दाखल झालेल्या पेंग्विनचे दर्शन मुंबईकरांना आता लवकरच होणार आहे. येत्या काही दिवसांत पेंग्विन्सना राणीच्या बागेतल्या एक्झिबिट एरियात आणण्यात येणार असून, सध्या याबाबतची चाचणी सुरू आहे.
राणीच्या बागेत पेंग्विन्सना आणल्यानंतर त्यांच्यासाठी येथे क्वारंटाईन एरिया तयार करण्यात आला. या ठिकाणी पेंग्विन्ससाठी पोषक असे शीत वातावरण तयार करण्यात आले.
आता त्यांना दर्शनी भागात दाखल केले जाणार असून, यासाठीची चाचणी सुरू आहे. दक्षिण कोरिया येथून एकूण आठ पेंग्विन्सना आणण्यात आले होते. यापैकी एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाला होता. पेंग्विन्ससाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
दुसरीकडे एका पेंग्विनच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या राजकारणामुळे पेंग्विन्सचे दर्शन मुंबईकरांना कधी होणार? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता सुरू झालेल्या चाचणीमुळे पेंग्विन दर्शनाची कवाडे खुली होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)