मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास होणार ठप्प

By admin | Published: June 8, 2015 03:18 AM2015-06-08T03:18:14+5:302015-06-08T03:18:14+5:30

इमारतींचा पुनर्विकास करताना दोन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू होईल, या सरकारी आदेशामुळे त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतींचा पुनर्विकास ठप्प झाला आहे.

Mumbai's buildings will be redeveloped | मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास होणार ठप्प

मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास होणार ठप्प

Next

संदीप प्रधान, मुंबई
बृहन्मुंबईतील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंद रस्त्यालगत असलेल्या इमारतींचाच पुनर्विकास करताना दोन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू होईल, या सरकारी आदेशामुळे त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतींचा पुनर्विकास ठप्प झाला आहे. आतापर्यंत सरसकट २ एफएसआय लागू केला जात होता. सरकारच्या आदेशाच्या विरोधात बिल्डर, रहिवासी यांनी २४ हजार आक्षेप नोंदवले आहेत.
बृहन्मुंबईचा नवा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर २०१४ ते २०३४ पर्यंत लागू होणारी विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या १९९१ च्या विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार बांधकामांना मंजुरी दिली जाते. त्यानुसार बृहन्मुंबईत पुनर्विकास होणाऱ्या इमारतींना एक एफएसआय वापरला, तर एक विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) म्हणजे दोन एफएसआय वापरण्याची परवानगी होती. सरकारने काढलेल्या नव्या आदेशानुसार ९ ते १२ मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एक एफएसआय वापरल्यावर ०.५० टीडीआर म्हणजे १.५० एफएसआय वापरण्यात येईल. १२ ते १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एक एफएसआय वापरल्यावर ०.७५ टीडीआर म्हणजे १.७५ एफएसआय वापरण्यात येईल. १८ ते २४ मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एकूण दोन एफएसआय, २४ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांकरिता एकूण २.२५ एफएसआय वापरण्यात येईल. ३० मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांकरिता एकूण २.५० एफएसआय वापरण्यात येईल. विशेष म्हणजे नवीन विकास नियंत्रण नियमावली अमलात येईपर्यंत सध्याच्या नियमावलीनुसार बांधकाम करतानाही याच सूत्रानुसार टीडीआर वापरता येईल, असे आदेशात नमूद केले आहे.
बृहन्मुंबईत १८ मीटर (६० फूट) रुंदीच्या रस्त्यांची संख्या कमी असून बहुतांश रस्ते अरुंद आहेत. गिरगाव, काळबादेवी, दादर, माटुंगा, शीव, घाटकोपर, विलेपार्ले अशा अनेक भागातील ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव या निर्णयामुळे ठप्प झाले आहेत. एफएसआय ०.२५ ते ०.५० इतका कमी झाल्याने दीर्घकाळ रहिवाशांबरोबर वाटाघाटी करून मूळ रहिवाशांना द्यायच्या सदनिकांचे क्षेत्रफळ निश्चित केल्यानंतर आता अचानक एफएसआय घटल्यामुळे छोट्या सदनिका घेण्यास रहिवाशी तयार होत नाहीत. ज्या छोट्या शहरांत टीडीआर लागू नाही तेथे रस्त्यांच्या रुंदीनुसार टीडीआर वापराचे नियम लागू करणे योग्य आहे, असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
 

Web Title: Mumbai's buildings will be redeveloped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.