राज्याच्या जडणघडणीत मुंबईचे योगदान मोठे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:07 AM2019-05-02T05:07:19+5:302019-05-02T05:07:52+5:30
नवीन, बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे; राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यामध्ये मुंबईचे मोठे योगदान आहे. बहुसंख्य बँका, उद्योग समूह आणि वित्तीय संस्थांची मुख्यालये मुंबईत आहेत. देशाचा सर्वांत मोठा शेअर बाजार आणि जगप्रसिद्ध चित्रपट नगरी याच शहरात आहे. मुंबई भारताच्या महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असून येथून मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार चालतो. औद्योगिक उत्पादने, आर्थिक आणि सेवा क्षेत्राचे हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे, असा मुंबईचा गौरव करत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र दिनाच्या तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र हे देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून ते देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे सांगताना राज्यपालांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८व्या वर्धापन दिनी नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले.
महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा बुधवारी शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांच्यासह राज्य शासन आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे कौन्सुलेट जनरल आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल पुढे म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञान व वाहन उद्योगनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून पुणे शहर उदयास आले आहे. नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरेदेखील विकासाची शक्तिकेंद्रे आहेत.
या वेळी सशस्त्र पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस दल, निशाण टोळी, मुंबई लोहमार्ग पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल, महापालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, ब्रास बँड पथक, पाइप बँड पथक आदी दलांनी संचलन केले. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले. अग्निशमन दलाचे हॅजमेट वाहन, फोम टेंडर वाहन, मिनी फोम टेंडर वाहन आदींनी संचलनात सहभाग घेतला. यानंतर राज्यपाल राव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांनी क्रीडा भवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला.