मुंबईच्या निकालात एक टक्क्याने घट
By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
मुंबई- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला आहे.
चेतन ननावरे,
मुंबई- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला आहे.
गेल्या वर्षी ९२.९० टक्के निकालावर झेपावलेल्या मुंबई विभागाला यंदा ९१.९० टक्के निकालावर समाधान मानावे लागले. मात्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांतील चौथे स्थान मुंबईने कायम राखले आहे.
मुंबई विभागीय मंडळातील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगर आणि मुंबई पूर्व उपनगराचा निकाल पाहिल्यास प्रत्येक जिल्ह्यात मुली या मुलांहून वरचढ ठरल्या आहेत. एकूण ९१.९० टक्के निकालात मुलींचे प्रमाण ९३.०७ टक्के असून मुलांचे प्रमाण ९०.८३ टक्के एवढे आहे. त्यामुळे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. या वर्षी मुंबई विभागीय मंडळातून ३ लाख २४ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३ लाख २३ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.९० इतकी आहे. याउलट गेल्या वर्षी मुंबई विभागीय मंडळाचा निकाल ९२.९० टक्के लागला होता.
>शून्य टक्के निकालाच्या २५ टक्के शाळा मुंंबईत
>राज्यातील ६१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असून त्यातील सुमारे २५ टक्क्यांहून अधिक शाळा म्हणजेच १६ शाळा या मुंबई विभागीय मंडळातील आहेत. मुंबई विभागात ३,५८३ शाळा असून त्यातील ८६५ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. हे प्रमाण राज्यातील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या २० टक्क्यांवर आहे. त्यामुळे मुंबई विभागीय मंडळातील शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये असलेली तफावत भरून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
>रायगड, नवी मुंबईत
मुलींची बाजी!
अलिबाग/ नवी मुंबई : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या १०वीच्या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला. राज्यातील नऊ विभागात कोकण विभागाचा निकाल ९६.५६ टक्के लागला असून कोकणाने राज्यात प्रथम स्थान संपादन केले आहे. तर नवी मुंबईतून १३७ शाळांमधील एकूण १३ हजार ६०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ हजार ९५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवी मुंबई शहराचा निकाल ९५.२७ टक्के लागला. रायगड जिल्ह्याचा निकाल ९१.१२ टक्के लागला. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत पेण तालुक्याचा निकाल ९३.२१ टक्के लागला असून पेण तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. बारावी परीक्षेप्रमाणेच दहावी शालान्त परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. रायगड जिल्ह्यातील ५२३ शाळांमधील ३७ हजार ३४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नवी मुंबईतून ७२११ मुले तर ६३९० मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ६८३४ मुले आणि ६१२३ मुली उत्तीर्ण झाले. नवी मुंबईतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ९५.८२ टक्के मुलींनी बाजी मारली आहे तर मुलांमध्ये हे प्रमाण ९४.७७ टक्के इतके आहे.
>प्रणवची ‘फर्स्ट क्लास’ बॅटिंग
>मुंबई : क्रिकेटविश्वातील ‘हजार’ मनसबदारी म्हणून ओळखला जाणारा कल्याणचा विक्रमवीर प्रणव धनावडे याने दहावीच्या परीक्षेतही फर्स्ट क्लास बॅटिंग केली आहे. ६१ टक्के गुणांसह दहावी परीक्षेत प्रणव प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाला आहे.
या ‘फर्स्ट क्लास’ यशामुळे त्याच्या कुटुंबीयांसह प्रशिक्षक आणि शालेय शिक्षकांनीदेखील आनंद व्यक्त केला. मिठाई भरवून सर्वांनी त्याचे कौतुक केले. यावर प्रतिक्रिया देतान प्रणव म्हणाला की, ‘खूप आनंदी आहे. परीक्षेचे दडपण न घेता मनमोकळेपणाने अभ्यास केला. आई-बाबांनीही योग्य सहकार्य केले. ‘क्रिकेटचा सराव’ आणि ‘अभ्यास’ यांचा मेळ बसवताना प्रशिक्षक आणि शिक्षक यांनी सांभाळून घेतले.
त्यांच्यामुळेच दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकलो. मुंबईतील महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून शिक्षण सुरू ठेवण्याचा मानस त्याने व्यक्त केला. सोबतच क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छाही प्रणवने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
क्रिकेट क्षेत्रासह अभ्यासातदेखील प्रणवने चांगली कामगिरी केल्यामुळे त्याच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. यापुढेदेखील तो अभ्यास करून क्रिकेट खेळत राहील, अशी प्रतिक्रिया प्रणवच्या बाबांनी ‘लोकमत’ला दिली. प्रणवचा निकाल समजताच त्याच्या मित्रमंडळींनी जल्लोष केला. शिवाय त्याच्या या निकालामुळे प्रणवने क्रिकेटच्या मैदानासह अभ्यासाचे मैदानही गाजवले, अशी प्रतिक्रिया त्याच्या मित्रमंडळींनी दिली.
>सलग तीन वर्षे १०० % निकाल
विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच सलग तीन वर्षे शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमधील शाळांचा निकाल १००% लागला आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षी निकालात सातत्य राखण्याचे आव्हान असेल.
- भगवान भंगाळे, मुख्याध्यापक,
पराग विद्यालय, भांडुप
>प्रतिकूल परिस्थितीत १०० टक्के निकाल
धारावी परिसरातील वेगवेगळ््या पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम संस्था करत आहे. खडतर परिस्थितीत इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला, याचा आनंद आहे. मात्र, मराठी माध्यमाचा निकाल ९६.५% इतका लागला असला, तरी पुढील वर्षी तो १०० लावण्याचा प्रयत्न असेल. शाळेच्या घवघवीत यशामध्ये शाळेच्या शिक्षकवृंदाचा मोठा वाटा आहे. शिक्षकांच्या मेहनतीला विद्यार्थ्यांनी गुण स्वरूपात सिद्ध करून दाखविले आहे.
- राजेंद्र प्रधान, (अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल - सायन)
>विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
>माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख व कलचाचणीचा कलअहवाल यांचे वाटप बुधवारी, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता होईल. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, कलअहवाल यांचे वाटप दुपारी ३ वाजता शाळांमध्ये केले जाईल.मंगळवारी, ७ जूनपासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करता येतील. त्यासाठी एक अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जासोबत गुणपत्रिकेची प्रत (संकेतस्थळावरील प्रिंटआऊट) जोडणे आवश्यक आहे.
गुणांची पडताळणी करायची असेल, अशा विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात आणि शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे मंगळवारी, ७ जून ते गुरुवारी १६ जूनदरम्यान अर्ज करायचा आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी, ७ जून ते सोमवारी, २७ जूनदरम्यान अर्ज करायचा आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क रोखीने किंवा डिमांड ड्राफ्टने विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहे.
>कालपर्यंत निकालाची धाकधुक होती. आज निकाल कळाला तेव्हा खूप आनंद झाला. आई-बाबा, शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. आता पुढील शिक्षणाकडेही लक्ष द्यायचे आहे. मला अभियांत्रिकीमध्ये करियर करायचे आहे.
- नम्रता बोऱ्हाडे, (९६.४०%, बालमोहन विद्यामंदिर - दादर)
खूप आनंद झाला आहे. घरी अभिनंदनासाठी येणारी प्रसारमाध्यमांची गर्दी पाहून भारावून गेले आहे. आई-बाबांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे. शाळा प्रशासनानेही खूप मेहनत घेतली. ‘कार्डीओलॉजी’ विषय घेऊन एम.एस. करायचे आहे.
- स्वराली चोडणेकर, (९९%, व्ही. एन. सुळे महाविद्यालय-दादर)
निकाल कळाल्यावर खूप आनंद झाला. वर्षभर केलेल्या मेहनतीचे चीज झाले. केमिकल इंजिनीअर व्हायचे आहे. मुंबईतून पहिले येण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण, निराश न होता पुढील परीक्षांसाठी जीव तोडून मेहनत करणार आहे.
- शरण शेट्टी (९८.२०%,
सेंट जोसेफ हायस्कुल - विक्रोळी)
शाळेतून पहिली आल्याचा खूप आनंद आहे. आई-बाबा, आजोबा-आजी आणि ताईने माझा अभ्यास व्हावा, म्हणून विशेष मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे. पुढे विज्ञान शाखेत करीअर करायचे आहे.
- किर्ती पाटील, (९७.२%,
शिव शिक्षण संस्था-शीव)
आणखी चांगल्या गुणांची अपेक्षा होती. शाळेतही मुला-मुलींमध्ये गुणांची चढाओढ असतानाही साऱ्यांनीच एकमेकांची मदत करुन अभ्यास केला. त्याचा फायदा झाला. यासाठी वर्गमित्र, आई-बाबा आणि शिक्षकांचे मनापासून आभार मानतो. ‘रसायनशास्त्र’ विषयात रस आहे. त्यामुळे पुढे त्याच विषयात अभियांत्रिकी करण्याचे ठरवले आहे.
- बाळकृष्ण सावंत, (९६.४०%, पराग विद्यालय-भांडुप)