काँग्रेसच्या काळातच मुंबईचा विकास
By admin | Published: February 13, 2017 03:53 AM2017-02-13T03:53:25+5:302017-02-13T03:53:25+5:30
जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली
मुंबई : जागतिक दर्जाचे विमानतळ असो की मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी मार्ग, इस्टर्न फ्री वे अशी सारी विकासकामे केवळ काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मात्र, वीस वर्षे पालिकेत सत्ता गाजविणाऱ्या शिवसेना-भाजपाला मुंबईसाठी साध्या मूलभूत सोईसुविधा पुरवता आल्या नाहीत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी केली.
रविवारी मुंबई काँग्रेसतर्फे अंधेरी येथील रहेजा आयोजित कार्यक्रमात चिदंबरम बोलत होते. या वेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी आदी नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, मुंबई हे देशाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे आणि इथे चांगले रस्ते नाहीत, रेल्वेची चांगली सुविधा नाहीत. महापालिकेकडून, सरकारकडून सामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, त्याही मुंबईत मिळत नाहीत. गेल्या वीस वर्षांमध्ये महापालिकेच्या सत्तेवर असणारे सामान्य जनतेला चांगले रस्ते, चांगली दळणवळणाची साधने का देऊ शकले नाहीत, असा आरोप चिदंबरम यांनी केला.
जो देश अंतराळात यान पाठवतो. इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे, अशा देशातील मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना मिळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. सध्या मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरत चालला आहे. देशाचा विकासदर २०१६-१७ मध्ये ७.९ टक्क््यांवरून ६.६ टक्क्यांवर घसरला आहे. आगामी काळात आणखी त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. हा नोटाबंदीचा परिणाम आहे. या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक व सामान्य जनतेला फार हाल सहन करावे लागले. लोकांचा बँकांवरून विश्वास उडाला आहे. सध्या जो अर्थसंकल्प सादर केला गेला, त्यातही मध्यमवर्गीय, तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी काहीही दिलासा देण्यात आली नसल्याची टीका चिदंबरम यांनी केली. (प्रतिनिधी)