मुंबईकरांची ‘इकोफ्रेंडली’ मेट्रो
By admin | Published: June 5, 2017 02:16 AM2017-06-05T02:16:31+5:302017-06-05T02:16:31+5:30
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो प्रकल्पाने मुंबईकरांना दिलासा दिला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो प्रकल्पाने मुंबईकरांना दिलासा दिला. विशेषत: मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या परंतु पश्चिम उपनगराशी कनेक्ट असणाऱ्या प्रवाशांचा वेळ पहिल्या मेट्रोमुळे वाचला. पर्यायाने रस्ते वाहतुकीवरील रिक्षा, टॅक्सी, बेस्ट आणि मरेवर काहीसा ताण कमी झाला. आणि हाच वेगवान प्रवास करताना मुंबईकरांना मेट्रो आपलीशी वाटू लागली असतानाच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-३ ला हात घातला. मेट्रो-३ साठी होत असलेल्या झाडांच्या कत्तलीप्रकरणी कॉर्पोरेशन टीकेची धनी होत असली तरीदेखील भविष्यात हीच भुयारी मेट्रो मुंबापुरीचे चित्र पालटणार असून, अशाच काहीशा ‘इकोफ्रेंडली’ मेट्रोचा ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्ताने आढावा घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये लोकांच्या दारापर्यंत मेट्रो रेल्वे पोहोचवून आता अपुऱ्या भासणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेला पूरक ठरणारी सार्वत्रिक जलद वाहतूक प्रणाली बनण्याचा मेट्रो रेल्वेचा प्रयत्न आहे. मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयी-सुविधा उपलब्ध होतील.
एकविसाव्या शतकातील एक अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्प म्हणून मुंबई मेट्रो-३ मार्गाकडे पहिले जाते. या भुयारी प्रकल्पाची बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या इमारतींचे संरक्षण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
प्रवासी मेट्रो ट्रॅकवर जाऊ नयेत म्हणून विशेष सूचना देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो स्थानकांवर स्वयंचलित प्रवासभाडे यंत्र बसविण्यात येणार आहे. यामुळे जमा होणारा निधी मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवणे शक्य होणार आहे.
कनेक्टिव्हिटी आणि कमी मूल्य/किंमत असणाऱ्या सोयी आल्यापासून आव्हाने अनेक आहेत. मुंबईतील प्रवास हा आरामदायी, सुरक्षित व आनंददायी बनवून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवीन युग सुरू व्हावे, असा मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचा उद्देश आहे.
मेट्रोचे पर्यावरण धोरण
मार्गिकेतील सध्याच्या हरित पट्ट्याला पूरक पट्टा तयार करणे.
संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शहरात पर्यावरणपूरक वाहतूक निर्माण करणे व उत्सर्जन आणि कचरा कमी करणे.
भागधारकांमध्ये पर्यावरणीय उद्दिष्टांच्या बाबत जागरूकता निर्माण करणे व प्रशिक्षण देणे तसेच पर्यावरण रक्षण प्रक्रिया, प्रकल्प अंमलबजावणीमध्ये व नंतरच्या टप्प्यांमध्ये समाविष्ट करणे.