मुंबईकरांसाठी पहिलं तरंगतं हॉटेल
By Admin | Published: March 12, 2017 12:32 PM2017-03-12T12:32:22+5:302017-03-12T15:16:13+5:30
गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या तरंगत्या हॉटेलमुळे पर्यटकांना समुद्राची सफर करता करता मेजवानीचाही आनंद घेता येणार आहे. वांद्रे रेक्लमेशनजवळ ए. बी. सेलेस्टियन या खासगी कंपनीनं हे हॉटेल सुरू केलं असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, डब्ल्यू बी इंटरनॅशनल कन्सल्टंट्स आणि एबी यांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
या तरंगत्या हॉटेलमधून अथांग समुद्राचं नयनरम्य दर्शन होणार असून, समुद्रातून मुंबईची भव्यताही पाहता येणार आहे. तब्बल 175 कोटी रुपयांचे तरंगते हॉटेल (जहाज) मुंबईतील समुद्रात अवतरलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईत येताच गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, हेरिटेज वास्तू, हॉटेल, चौपाट्या तसेच धार्मिक स्थळांसह अनेक ठिकाणांना भेटी देतात. मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता एमटीडीसीकडून मुंबईतील पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यावर भर दिला जात आहे. चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट प्रकल्प हाती असतानाच मुंबईतील समुद्रात तरंगणारे हॉटेल मुंबईकर आणि पर्यटकांसाठी एमटीडीसीनं खुले केले आहे.
(मुंबईजवळ 175 कोटींचे तरंगते हॉटेल)
तत्पूर्वी मुंबईतील वरळी येथील समुद्रात मागील वर्षीही एका खासगी कंपनीच्या साहाय्याने तीनमजली तरंगणारे हॉटेल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र एक महिना ही सेवा झाल्यानंतर ती बंद करण्यात आली. मात्र वरळी येथील समुद्रात मागील वर्षी सुरू करण्यात आलेली सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे एमटीडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.