मुंबईतील मराठा मोर्चा निघणारच!
By admin | Published: January 9, 2017 04:54 AM2017-01-09T04:54:46+5:302017-01-09T04:54:46+5:30
मुंबईसह इतर महापालिकांची होऊ घातलेली निवडणूक आणि इतर कारणांमुळे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारीला मुंबईत
मुंबई : मुंबईसह इतर महापालिकांची होऊ घातलेली निवडणूक आणि इतर कारणांमुळे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारीला मुंबईत काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचा निर्णय मुंबईच्या समन्वय समितीने रविवारी जाहीर केला. मात्र असा कोणताही निर्णय झालेला नाही. हा मोर्चा निघणारच, असे औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.
परळच्या दामोदर सभागृहात रविवारी दुपारी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगडसह अन्य जिल्हा व तालुका प्रतिनिधी व समन्वयकांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील जिल्हावार मोर्चाच्या संयोजकांची बैठक १५ जानेवारीला दादर येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संयोजकाच्या बैठकीत मुंबईतील मोर्चाची अंतिम तारीख ठरण्याची शक्यता आहे. या आधी औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत, मुंबईत ३१ जानेवारी रोजी मराठा क्रांती महामोर्चा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
तथापि, औरंगाबाद येथील समन्वयक रवींद्र काळे यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. मोर्चा रद्द झाल्याच्या बातम्या तथ्यहीन असून मोर्चा ठरल्याप्रमाणे होईल. या मोर्चाच्या ठिकाणाची आणि नियोजनाची पहाणी आपण केली आहे. मोर्चा रद्द झाल्याच्या अफवा विघ्नसंतोषी लोकांनी पसरवल्या असून त्यावर विश्वास ठेवू नका, असे काळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मोर्चाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)