मुंबईचा दूध पुरवठा बंद होणार नाही - महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 08:15 PM2018-07-15T20:15:03+5:302018-07-15T20:19:52+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिला असला तरी मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत राहील आणि विविध भागात पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा केला जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे पशु संवर्धन आणि दुगध विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाशिक- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिला असला तरी मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत राहील आणि विविध भागात पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा केला जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे पशु संवर्धन आणि दुगध विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आंदोलकाविषयी आपण बोलणार नाही, पण कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली जाणार आहे. मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही. दूध उत्पादकांनी कोणालाही न घाबरता दूध पुरवठा करावा, त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, दुधाला 20 तारखेपासून 3 रुपये दरवाढ केली जाणार आहे आणि जीएसटी कमी झाल्यास 2 रुपये होणार कमी आहेत, असे एकूण 5 रुपये दरवाढ केलीच आहे, असेही यावेळी महादेव जानकर म्हणाले.
दरम्यान, दूध अनुदानप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मध्यरात्रीपासून आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. याचबरोबर, राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. तसेच राज्य शासनाने संघटनेच्या कार्यकर्त्यांची कितीही धरपकड केली तरी या दडपशाहीला न जुमानता दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ किंवा तेवढे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.