मुंबईच्या किमान तापमानात २४ तासांत दोन अंशांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 06:04 AM2019-12-18T06:04:51+5:302019-12-18T06:05:11+5:30
महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक गारठा; विदर्भात पावसाच्या हलक्या सरी
मुंबई : राज्यातील मंगळवारचे किमान तापमान पाहता महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक गारठा होता. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तर, गेल्या २४ तासांत मुंबईच्या किमान तापमानात मात्र २ अंशांची वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, सोमवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंशांच्या आसपास होते. राज्याच्या किमान तापमानात घसरण होत असताना आणि सोमवारच्या ‘कूल मॉर्निंग’नंतर मंगळवारी मुंबईच्या किमान तापमानात घट होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र किमान तापमानात दोन अंशांची वाढ झाली आणि कमाल तापमानही ३३.६ अंश नोंदविण्यात आले.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
१८ ते २१ डिसेंबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. बुधवारसह गुरुवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३, २१ अंशांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बीकेसी, माझगावची हवा पुन्हा बिघडली
मुंबईच्या किमान तापमानात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी २ अंशांची वाढ नोंदविण्यात आली असून, मंगळवारी मुंबईची हवाही बिघडल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण पार्टीक्युलेट मॅटरमध्ये मोजण्यात येत असून, मंगळवारी माझगाव, बीकेसी, अंधेरी आणि बोरीवली येथील हवा वाईट नोंदविण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबईतील हवेचा स्तर दरवेळी खालावल्याची नोंद करण्यात येते. मंगळवारी मात्र येथील हवा समाधानकारक होती.
शहरांचे मंगळवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे १५.६
अहमदनगर १५.५
जळगाव १६.४
मालेगाव १६.२
नाशिक १६.२
सांगली १६.६
सातारा १६
उस्मानाबाद १४.४
औरंगाबाद १४.९
परभणी १६.५
अकोला १६.४
अमरावती १५.४
चंद्रपूर १५
गोंदिया १५.२
नागपूर १४.१
वाशिम १६.२
वर्धा १५.४
यवतमाळ १६.४