मुंबईचे किमान तापमान १६ अंशांवर स्थिर, विदर्भाला थंडीच्या लाटेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:21 AM2018-01-30T04:21:15+5:302018-01-30T04:21:30+5:30
समुद्राहून वाहणारे वारे, वा-याची बदलती दिशा, ढगाळ हवामान आणि उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहणारे शीत वारे; वातावरणातील या प्रमुख घटकांमधील चढउतारामुळे राज्यासह मुंबईतला थंडीचा कडाका कायम आहे.
मुंबई : समुद्राहून वाहणारे वारे, वाºयाची बदलती दिशा, ढगाळ हवामान आणि उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहणारे शीत वारे; वातावरणातील या प्रमुख घटकांमधील चढउतारामुळे राज्यासह मुंबईतला थंडीचा कडाका कायम आहे. राज्यासह मुंबई थंडीने गारठली असतानाच मंगळवारी विदर्भात थंडीची लाट येईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान १६ अंशांवर स्थिर राहिल्याने मुंबईतला गारवाही कायम असून, मंगळवारसह बुधवारीही मुंबईचे किमान तापमान १७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईतला थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट होती. विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअस
मुंबई १६
भिरा १५
पुणे ११.५
अहमदनगर १०.१
जळगाव ९
महाबळेश्वर १४.६
मालेगाव १२.४
नाशिक ९.९
सांगली १५.३
सातारा १२.९
उस्मानाबाद १२.९
औरंगाबाद १२.६
परभणी ११
नांदेड १४.५
अकोला १२.५
अमरावती १४
चंद्रपूर १३.२
गोंदिया ८
नागपूर ९.३
वाशिम १०.६
यवतमाळ १३.४