मुंबईचा ‘बेपत्ता’ तरुण पाक लष्कराच्या ताब्यात

By admin | Published: January 15, 2016 04:23 AM2016-01-15T04:23:04+5:302016-01-15T04:23:04+5:30

‘बेपत्ता’ झालेला आपला मुलगा जिवंत असून, तो पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात आहे, अशी माहिती मिळाल्याने गेली तीन वर्षे हवालदिल झालेल्या मुंबईतील अन्सारी दाम्पत्याला

Mumbai's 'missing' young Indian soldier | मुंबईचा ‘बेपत्ता’ तरुण पाक लष्कराच्या ताब्यात

मुंबईचा ‘बेपत्ता’ तरुण पाक लष्कराच्या ताब्यात

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई

‘बेपत्ता’ झालेला आपला मुलगा जिवंत असून, तो पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात आहे, अशी माहिती मिळाल्याने गेली तीन वर्षे हवालदिल झालेल्या मुंबईतील अन्सारी दाम्पत्याला बुधवारी थोडा दिलासा मिळाला. हमीद या मुलाचा शोध घेण्यासाठी या दाम्पत्याने पेशावर उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस्’ याचिका केली आहे. ‘हमीद हा आमच्या कोठडीत असून, त्याच्यावर लष्करी न्यायालयात खटला सुरू आहे,’ असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या वकिलाने या याचिकेवरील सुनावणीत बुधवारी सांगितले.
‘हमीद अन्सारी हा मुंबईतून एमबीए शिकलेला आहे. २०१२मध्ये तो अफगाणिस्तानातून पाकिस्तानात गुपचूप गेला व त्यानंतर तो बेपत्ता झाला. आमचा मुलगा किमान जिवंत असल्याचे ऐेकून आम्हाला आनंद झाला,’ असे अन्सारी दाम्पत्याने सांगितले. ‘पाकिस्तानला जाण्यासाठी आम्हाला आतापर्यंत नाकारण्यात आलेला व्हिसा आता दिला जावा, म्हणजे आम्ही त्याला भेटू शकू,’ असे ते म्हणाले.

मुलाखतीसाठी सांगून गेला...
‘४ नोव्हेंबर २०१२ रोजी हमीद आम्हाला अफगाणिस्तानात विमानसेवेशी संबंधित कंपन्यांमध्ये थेट मुलाखती (वॉक इन इंटरव्ह्यूज) असल्याचे व मला त्या द्यायच्या आहेत, असे सांगून गेला. 
मी अनुभव घेऊन पाच ते सहा महिन्यांत परत येईन आणि नंतर नोकरीसाठी भारतात अर्ज करीन, असे तो म्हणाला होता. 
१० नोव्हेंबरपर्यंत तो आमच्या संपर्कात होता व त्यानंतर तो बेपत्ता झाला,’ असे त्याची आई फौजिया अन्सारी यांनी सांगितले. फौजिया अन्सारी प्राध्यापक आहेत.

आदिवासी मुलीशी प्रेमसंबंध...
फौजिया अन्सारी म्हणाल्या की,‘आम्ही त्याच्याशी संपर्क साधू न शकल्यामुळे आम्ही त्याचे फेसबुक अकाउंट उघडले आणि तो ४ ते ५ पाकिस्तानींच्या संपर्कात असल्याचे आमच्या लक्षात आले. तो त्यांच्याशी निमबज्ज मेसेंजरवर चॅटिंगही करायचा. त्याचे पाकिस्तानातील जिरगा येथे आदिवासी मुलीशी प्रेमसंबंधही असावेत, असा आमचा संशय आहे व तिच्या पालकांनी त्याला मान्यता दिली नाही. तेथील वनी परंपरेनुसार मुलीच्या कुटुंबाचा ज्या कुटुंबाशी वाद आहे, तो मिटविण्यासाठी त्या कुटुंबात तिचा विवाह केला जातो. हमीदने आम्हाला कधीही त्या मुलीबद्दल सांगितले नाही. आमच्याशी त्याच्या झालेल्या संभाषणातून त्या मुलीची तेथून सुटका करून तिच्याशी त्याला लग्न करायचे आहे, असा संशय आम्हाला आला,’ असे फौजिया अन्सारी म्हणाल्या.
फौजिया अन्सारी म्हणाल्या की,‘हमीद आमचे मित्र ग्राफिक डिझायनर अत्ताऊर रहमान, डॉ. शाझिया खान आणि एमबीए झालेले अब्दुल्ला आणि हुमारिया यांच्या संपर्कात होता. या लोकांनी त्याला काळजी करू नकोस, पाकिस्तानात जा, असे सांगून तुला काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले होते.’

अनेकदा व्हिसा नाकारला...
‘हमीद बेपत्ता असल्याची तक्रार आम्ही वर्सोव्यात दाखल केली आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आणि अफगाणिस्तानचा दूतावास व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही पत्र लिहिले. त्याला शोधून काढू शकतील, अशा होईल तेवढ्या संस्थांना आम्ही पत्रे लिहिली होती. त्या प्रयत्नांतून आमचा संपर्क पाकिस्तानातील स्थानिक वार्ताहर झीनत शहझादी यांच्याशी झाला आणि त्यांनी त्या मुलीचे वडील, तिच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतरांशी बोलून आम्हाला मदत केली. शहझादी यांनी आम्हाला तिच्या वडिलांनी तिचे लग्न करून टाकल्याचे सांगितले. तिकडे जाण्यासाठी आम्ही अनेक वेळा व्हिसासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला,’ असे फौजिया म्हणाल्या.
‘झीनत शहझादी यांनी चौकशी केली आणि हमीद अत्ता ऊर रहमान यांच्यासोबत दोन दिवस राहिल्याचे त्यात स्पष्ट झाले. पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याने कोहट येथील हॉटेलमधून हमीदला अटक केल्याचेही झीनत यांना आढळले. आम्हाला रहमानने हमीदकडील पैसे घेऊन पोलिसांना कळविले असावे, असा संशय आहे.’

२० लाखांहून अधिक खर्च...
हमीदचे वडील निहाल अन्सारी म्हणाले की, ‘पाकिस्तानातील रोटरी क्लबचे सदस्य अदनान रोहेल्ला यांच्याशी झीनतचा संपर्क करून देण्यात आला व अदनान यांनी हमीदच्या फेसबुक अकाउंटवर फ्रेंडस् रिक्वेस्ट पाठविली. आम्ही त्यांना (अदनान रोहेल्ला) सर्वकाही खुलासा करून सांगितले व त्यांच्या सूचनेवरून गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी हेबियस कॉर्पस अर्ज दाखल केला. आमच्यासाठी धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षी आॅगस्टपासून झीनत शहझादीच बेपत्ता आहेत. त्यांचेही अपहरण झाल्याची भीती आम्हाला वाटत आहे. प्रसार माध्यमात आलेल्या वृत्तांवरून हमीदवर तेथील लष्करी न्यायालयात खटला सुरू असल्याचे आम्हाला समजले,’ असेही निहाल अन्सारी म्हणाले. ‘या सगळ््या प्रकरणात आम्ही २० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. हमीद सुटून यावा, अशी आम्हाला आशा आहे. झीनतबद्दलही आम्हाला काळजी वाटते. त्या सापडतील अशी आशा आहे. आम्ही दोन्ही सरकारांना यात हस्तक्षेप करून हमीदला सोडून देण्याचे आवाहन करतो,’ असे निहाल आणि फौजिया अन्सारी यांनी केले.
 

 

Web Title: Mumbai's 'missing' young Indian soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.