मुंबईचा पुढचा महापौर आमचा!
By admin | Published: December 26, 2016 05:16 AM2016-12-26T05:16:05+5:302016-12-26T05:16:05+5:30
अगला महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो...’ अशी नवी घोषणा भाजपाने रविवारी दिली.
मुंबई : अगला महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो...’ अशी नवी घोषणा भाजपाने रविवारी दिली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त परळ येथील कामगार मैदानात आयोजित कार्यक्रमात भाजपा नेत्यांनी मुंबईचा पुढचा महापौर भाजपाचाच असेल, असे जाहीर करत अप्रत्यक्षरीत्या महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणण्याचा निर्धारच व्यक्त केला.
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने कामगार कल्याण मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह मुंबईतील भाजपा नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातील सुंदर स्वप्न आहे. भारतीय जनता पार्टीला आजचे स्थान मिळवून देण्यात वाजपेयी यांचा वाटा मोठा आहे. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने पुढाकार घ्यावा. देशात कॅशलेस व्यवहार कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस वगळता प्रत्येक नेत्याने स्वबळाची घोषणा दिली.
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढचे सर्व पाहतील. भाजपाचे जे मंत्री झाले त्यांच्यापैकी कोणी वरिष्ठांची बॅग उचलली नाही. ज्यांनी उचलली ते बाहेर आहेत. ज्यांच्यात क्षमता आहे ते मंत्री झाले. त्यामुळे क्षमता सिद्ध करा, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले.
राज्यात सर्वांत अधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपाचे आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला १०० मार्क आहेत तर आपल्या मित्रपक्षाला चाळीसच मार्क आहेत. त्याची आपल्याशी बरोबरी होऊ शकेल का, असा सवाल करताना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर व्हायला हवा, अशी घोषणा भाजपा संघटन मंत्री रवी भुसारी यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)
संगीतकार साजिद यांचा भाजपा प्रवेश
संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद या जोडगोळीतील साजिद यांनी भाजपाच्या या सभेत पक्षात प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साजिद यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी संगीतकार साजिद यांच्यासोबत ‘दिल दिया है, जां भी
देंगे ऐ वतन तेरे लिए...’ हे गाणे गायले. मुख्यमंत्री गाणे गात असताना उपस्थितांनी उभे राहून दाद दिली.