मुंबईचे पाटणा केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 05:49 AM2017-02-09T05:49:41+5:302017-02-09T05:49:41+5:30

शिवसेनेने २० वर्षांत मुंबईचे रूपांतर पाटण्यात करून टाकले, अशी घणाघाती टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Mumbai's Patna made it | मुंबईचे पाटणा केले

मुंबईचे पाटणा केले

Next

मुंबई : शिवसेनेने २० वर्षांत मुंबईचे रूपांतर पाटण्यात करून टाकले, अशी घणाघाती टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून माध्यमांचे लक्ष हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने वल्गना केल्या जात आहेत, आव्हानाची भाषा वापरली जात आहे. मात्र, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही पारदर्शक कारभाराचा मुद्दा मांडणार आणि तुमचा भ्रष्टाचार काढत राहणार. आमची विकासकामे सांगणार आणि तुम्ही काय विकास केला हे विचारत राहणार, असेही त्यांनी सुनावले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुलुंड येथील आपल्या पहिल्यावहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. या वेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह स्थानिक आमदार आणि पालिका उमेदवार उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या हवाल्याने मुंबई पारदर्शक कारभारात प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र, हा अहवाल वाचण्याची तसदीही शिवसेनेने घेतली नाही. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात हैदराबाद आणि बेंगळुरूनंतर मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. हा तिसरा क्रमांकसुद्धा राज्य सरकारमुळे मिळाला आहे. महापालिकेसंदर्भात राज्य सरकारने जे चार अहवाल सादर केले त्यात पैकीच्या पैकी गुण मिळाले. पात्र, पालिकेच्या ८ पैकी ५ निकषांत यांना भोपळाही फोडता आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारांनी अहवाल अर्धवट वाचला. सल्लागारांच्या अपुऱ्या माहितीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.
मागील वर्षाचा कार्यअहवाल सादर करणे, वॉर्डनिहाय वित्तीय मागणीचा अहवाल, वर्षभरातील नागरी कामांची आकडेवारी, माहितीच्या अधिकारात आमसभेचे निर्णय कळविणे आणि पालिका अर्थसंकल्पात जनसहभाग या पाचही निकषांत पालिकेला शून्य गुण मिळाले आहेत. मग कशाच्या आधारावर पारदर्शक कारभाराचे होर्डिंग लावता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. वॉर्ड कमिटी नेमणे, जनजागृती अशा निकषांत मुंबई पालिकेने गुण मिळविले आहेत. वॉर्ड कमिट्या नेमून पालिकेने असा कोणता तीर मारला. केंद्र सरकारच्या अहवालाचा नीट अभ्यास केला असता तर राज्य सरकारमुळेच तुमची इज्जत वाचली हे लक्षात आले असते, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव केली.

मुंबई पालिकेतील टेंडरचे मूल्यमापन केले असते तर यांचा शेवटचा क्रमांक आला असता आणि मुंबईची बदनामी झाली असती.
राज्य सरकारने कोस्टल रोडची परवानगी रखडवल्याचा आरोप केला गेला. त्यावरही उत्तर आहे, पण सगळेच आज उघड करणार नाही. कोस्टल रोडबाबत पुढच्या सभेत बोलेन.
सात वर्षे शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कामकाजाचा अंतर्गत लेखा अहवालच तयार होऊ दिला नाही. स्थायी समितीत ही अडवणूक करण्यात आली.
आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. निवडणुकीत टीआरपीचा कलगीतुरा करण्यासाठी आलो नाही. ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है; वही होता है जो मंजुर ए खुदा होता है!, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्ध्व ठाकरे यांना फटकारले.

रामदास आठवले यांची कविता
मुंबई में हार जाएगी शिवसेना, क्योंकी भाजप के साथ आयी है भीमसेना... तसेच हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना... अशा कविता रामदास आठवले यांनी सभेत ऐकविल्या.

...तर राजकारण सोडेन - उद्धव ठाकरे
मुंबईचे पाटणा झाले, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह पाटण्याचाही अपमान केला आहे. मुंबई आणि पाटण्याची तुलना करा, तशी ती झालीच तर मी राजकारण सोडेन. पण, मात्र, मुंबईचे पाटणा झाल्याचे ठरले नाही तर तुम्ही मुंबई सोडा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. मुंबई महापालिका पारदर्शकतेत देशात अव्वलच आहे, तसा अहवाल केंद्र सरकारनेच दिला आहे. केंद्रातून मुंबईचे कौतुक करणारे गाढव आहेत का, असा प्रश्न विचारतानाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची अर्धवटराव अशी संभावना केली.

Web Title: Mumbai's Patna made it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.