कोकणात मुंबईची प्रतिक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 01:34 AM2017-02-26T01:34:45+5:302017-02-26T01:34:45+5:30
कोकणी माणसाचे मुंबईशी जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच ते राजकीयसुद्धा आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय उलथापालथीची स्पष्टपणे प्रतिक्रियाही येथे उमटते. तशी ती जिल्हा
- वसंत भोसले, कोल्हापूर
कोकणी माणसाचे मुंबईशी जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच ते राजकीयसुद्धा आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय उलथापालथीची स्पष्टपणे प्रतिक्रियाही येथे उमटते. तशी ती जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही उमटली. कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होता होता तुटली तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे राजकारणही पलटले. परिणामी, रत्नागिरीत शिवसेनेने मुसंडी मारली, तर सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला बहुमताने पुन्हा सत्ता मिळाली. याला संपूर्ण मुंबईच्या राजकारणाची किनार होती.
रत्नागिरीत शिवसेना २५ सदस्यांसह गेली पाच वर्षे सत्तेवर होती. ही निवडणूक सुरू होताना इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे आणि नेत्यांमधील गटबाजीमुळे शिवसेना मागे पडेल असा व्होरा होता. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष अंतर्गत गटबाजीमुळे पोखरत होता. ही संधी साधण्यासाठी भाजपा जोरदार तयारी करीत अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश देत होती. शिवसेनेबरोबर युती करण्याचीही तयारी केली होती, पण मुंबईत युती तुटताच शिवसेना अधिक आक्रमकपणे लढत राहिली. शिवसेनेला बंडखोरांचेच आव्हान असे वाटत होते. त्याचबरोबर भाजपाही आव्हान उभे करीत आहे. मुंबईत युती तुटल्याने भाजपा आव्हान देत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्र आले आणि त्याने ५५पैकी ३९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस गटबाजीमुळे आव्हान उभेच करू शकली नाही. या पक्षाचे सदस्य १९वरून १५पर्यंत घसरले. काँग्रेसची हालत खूपच खराब राहिली. या पक्षाला एकमेव जागा मिळाली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही.
रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गाचे राजकारणही मुंबईप्रमाणे ढवळून निघाले. शिवसेना आणि भाजपा नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान द्यायचे, असे ठरवून गेल्या काही महिन्यांपासून एकत्र येत होते. त्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला होता. या दोन्ही पक्षांची युती झाली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते. पुन्हा मुंबईचे राजकारण त्यांच्या आडवे आले आणि शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढल्याने काँग्रेसने मुसंडी मारत ५०पैकी २७ जागा जिंकत राज्यातील काँग्रेसची बहुमत मिळविलेली एकमेव जिल्हा परिषद हा बहुमान पटकाविला. वास्तविक, या जिल्हा परिषदेने विविध पातळीवर उत्कृष्ट काम केले होते, पण केवळ राजकीय ईर्ष्येपोटी काँग्रेस विरुद्ध शिवसेना आणि भाजपा अशी लढाई झाली. त्यात नारायण राणे यांनी बाजी मारली. भाजपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या होत्या. दोन्ही जिल्ह्यांत मिळून भाजपाला सहाच जागा मिळाल्या. शिवसेनेच्या प्रचाराला कोणीही नेता न येता केसरकर यांच्यासह आमदार वैभव नाईक यांनी किल्ला लढविला. नारायण राणे यांचा पराभव करणारे वैभव नाईक यांचा पुन्हा एकदा कुडाळ मतदारसंघात प्रभाव दिसला.
कोकणचे राजकारण मुंबईतील हालचालीमुळे ठरते. तेथील प्रतिक्रिया स्पष्टपणे कोकणात उतरते.
त्यांची नजर मुंबईकडे असते. तसेच आताही पुन्हा घडले आहे. नारायण राणे यांनी त्याची संधी सिंधुदुर्गात साधली आणि रत्नागिरीत शिवसेनेने पेटून उठून सत्ता पुन्हा राखली.