मुंबईचे साहेब टून्न !

By Admin | Updated: December 10, 2014 00:48 IST2014-12-10T00:48:30+5:302014-12-10T00:48:30+5:30

विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली

Mumbai's Saaib Tune! | मुंबईचे साहेब टून्न !

मुंबईचे साहेब टून्न !

रात्रभर गोंधळ - कर्मचाऱ्यांना मारहाण
नरेश डोंगरे - नागपूर
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत मुक्कामी असलेल्या एका मद्यधुंद उच्चाधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी रात्रभर गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली आणि नोकरीहून काढून टाकण्याचीही धमकी दिली. शिपायापासून शीर्षस्थापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याने या प्रकाराचा निषेध नोंदविला असून, संबंधित उच्चाधिकाऱ्याच्या हा प्रताप चर्चा आज दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकार सध्या नागपुरात आले आहे. अर्थात सर्वच खात्याचे उच्च अधिकारीही नागपुरात मुक्कामी आहेत. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘या’ उच्चाधिकाऱ्याची निवास व्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेच्या दीक्षाभूमीजवळच्या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे. उच्चपदस्थ असल्यामुळे अर्थातच त्यांच्या दिमतीला शासकीय नोकरदारांचीही व्यवस्था आहे.
सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास हे अधिकारी महाशय निवासस्थळी पोहचले. प्रारंभी बाथरूम स्वच्छ नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. काही वेळेनंतर गरम पाण्याची व्यवस्था नसल्याच्या कारणावरून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. साहेब ‘तर्र’ असल्यामुळे त्यांना कुणी समजावण्याच्या भानगडीत पडले नाही. एका कर्मचाऱ्याने
निवासाच्या ठिकाणच्या सोयी सुविधा आपल्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगितले असता या अधिकाऱ्याने त्याला चक्क मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिथरलेल्या या उच्चाधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले. पहाटे ३ पर्यंत त्याचा गोंधळ सुरू होता.
नाश्त्यासाठी उद्धार
सकाळी चांगल्या दर्जाचा नाश्ता तातडीने मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांचाही या ‘साहेबांनी’ उद्धार केला. साहेबांकडून होत असलेला अपमान असह्य झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे फोनवरून तक्रारवजा माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याच्या उच्चाधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. दुपार झाली तरी साहेब शांत व्हायचे नाव घेत नसल्यामुळे कर्मचारी-अधिकारी संतप्त झाले. त्यांच्या निषेधाचे सूर कर्णोपकर्णी मंत्रालयात पोहचले. सायंकाळी कामगार मंत्री प्रकाश मेहता आणि त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या संतापजनक प्रकरणाची माहिती पोहचल्याचे सांगितले जाते.
वरिष्ठांची धावपळ
प्रकरण मंत्रालयात पोहचल्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेच ‘घटनास्थळ’ गाठून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘साहेब’ मोठे असल्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना ‘त्यांनी’ घातलेल्या गोंधळाची माहिती मंत्रालयात पोहचल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला. तक्रार करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी या उच्चाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे कर्मचारी-अधिकारी अधिकच संतप्त झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये, हा गोंधळ बाहेर चर्चेला येऊ नये म्हणून सर्वच संबंधितांना गप्प राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: Mumbai's Saaib Tune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.