मुंबईचा सोनू पहिलवान ठरला मानकरी
By admin | Published: March 13, 2016 01:45 AM2016-03-13T01:45:34+5:302016-03-13T01:45:34+5:30
शिरपूर जैन येथे कुस्तीची दंगलीत महाराष्ट्राच्या मल्लांचा बोलबोला.
शिरपूर जैन (वाशिम): येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल ठेवण्यात आली होती. यामध्ये ५१ हजारांच्या पहिल्या बक्षिसाचा मानकरी मुंबईचा सोनू पहिलवान ठरला. त्याने बीडचा बाळू कोरडे याचा पराभव केला.
शिरपूर जैन येथे प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल ठेवण्यात आली होती. ११ मार्च रोजी झालेल्या कुस्ती दंगलीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक हरिष गवळी यांच्या अध्यक्ष्तेखाली संस्थानचे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. या दंगलीमध्ये जालना, हिंगोली, नांदेड, बीड, मुंबईसह दिल्ली येथील पहिलवानांनी सहभाग घेतला होता. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये बीडच्या बाळू कोरडे यास मुंबईच्या सोनू पहिलवानाने पराभूत करून ५१ हजारांच्या पहिल्या बक्षिसाचा मानकरी ठरला. ३१ हजार या दुसर्या बक्षिसासाठी कोल्हापूरच्या संग्राम पाटीलने दिल्लीच्या कुलदीप सिंगला पराभूत केले. तिसर्या स्थनी पुणेच्या योगेश शिंदे याने दिल्लीच्या जितूसिंगला चित केले. चौथ्या स्थानी मात्र दिल्लीच्या अंकित मलिकने औरंगाबादच्या शकीलचा पराभव करून एकमेव दिल्लीचा खेळाडू बक्षिसास पात्र ठरला.