मुंबईकरांचा घसा बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 01:54 AM2016-11-03T01:54:49+5:302016-11-03T01:54:49+5:30

नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे.

Mumbai's sore throat | मुंबईकरांचा घसा बसला

मुंबईकरांचा घसा बसला

Next


मुंबई : दिवाळीत मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. नातेवाईकांना भेटणे, फटाके फोडणे, फराळ आणि त्यातच हवामानात झालेल्या बदलांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. दिवाळीत मुंबईकरांचा घसा बसला असून, ते सर्दी, खोकल्याने त्रस्त झाले आहेत.
आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. शेवटच्या आठवड्यात दिवाळीत वातावरणात गारवा आला. सध्या तापमानात बदल होत आहे. त्यामुळे सकाळी, दुपारी उकाडा आणि रात्री थंड वातावरण असते. त्यामुळे या कालावधीत विषाणूजन्य आजारांचा धोका वाढतो. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मुंबईत वाढले आहे. हे वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने आजार वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
दिवाळीत अनेक जण डाएट विसरले होते. चकल्या, चिवडा, लाडू, चिरोटे, करंज्या, शंकरपाळ््यांचा मनसोक्त आनंद लुटला आहे. फराळाच्या तेलकट, तूपकट पदार्थांमुळेही अनेकांच्या घशाला त्रास होत आहे. घसा खवखवणे, घसा बसणे असा त्रास अनेकांना जाणवत आहे. त्याचबरोबरीने फटाक्यांच्या धुराचा त्रासही मोठ्या प्रमाणात झाला आहे. फटाक्याच्या धुरामुळे खोकला, डोकेदुखी असा त्रासही वाढला आहे. सर्दी-खोकला, कणकण येणे अशा रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले.
दिवाळीत वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या श्वसनविकाराचा त्रास वाढला आहे. अनेकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, तर अस्थमा असणाऱ्या व्यक्तींचा त्रास अधिकच वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईकर आजारी पडल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
>दिवाळीपासून हवामानात बदल झाले आहेत. दिवसा गरम आणि रात्री थंड हवामान असते. त्याचबरोबरीने दिवाळीतील फटाके आणि फराळामुळे घसा दुखणे, घसा बसणे, सर्दी-खोकला असा त्रास वाढला आहे. खाण्यात झालेल्या बदलांमुळे पोटदुखीचा त्रासही काही जणांना झाला आहे. सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले आहे.
- डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

Web Title: Mumbai's sore throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.