मुंबईची वाहतूक ‘स्लो’ ट्रॅकवर

By admin | Published: August 6, 2016 05:31 AM2016-08-06T05:31:54+5:302016-08-06T13:16:31+5:30

शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला.

Mumbai's traffic on the 'Slow' track | मुंबईची वाहतूक ‘स्लो’ ट्रॅकवर

मुंबईची वाहतूक ‘स्लो’ ट्रॅकवर

Next


मुंबई : शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई उपनगरीय रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीला बसला. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. प्रतिकूल हवामानाचा परिणाम विमानसेवेवर झाला.
शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊ लागला. तिन्ही मार्गांवरील लोकल सकाळपासून १५-२० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे सकाळी चर्चगेट, सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होती. नोकरदारांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कुर्ला, सायन, माटुंगा, मशीद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांजवळील रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी ११.३० ते दुपारी १२.0५ दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतरही कुर्ला ते दादरपर्यंतचा लोकल प्रवास अत्यंत धिम्या गतीने होत होता. प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून सीएसटी ते कल्याणपर्यंतचा प्रवास करण्यास मुभाही देण्यात आली होती. मध्य रेल्वेला पावसाचा फटका बसलेला असतानाच पश्चिम आणि हार्बरवरील लोकलही १०-१५ मिनिटे उशिराने धावत होत्या.
रस्ते वाहतुकीचाही वेग कमी झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक होत होती. वाकोला रामनगर सब-वेजवळ, अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर, परेल टीटी, माटुंगा किंग्ज सर्कल जंक्शन, सायन मुख्याध्यापक भवन, कुर्ला कमानी फिनिक्स मॉलजवळ पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.
>म.रे.च्या १२१ लोकल फेऱ्या रद्द
दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेला शुक्रवारी मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लोकलचा वेग मंदावला व वेळापत्रकच विस्कळीत झाले. त्याचा परिणाम म्हणून दिवसभरात मध्य रेल्वेला १२१ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
...आणि समुद्राने कचरा परत केला!
मुंबईच्या समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर आपल्याकडील कचरा समुद्रात फेकण्याची मुंबईकरांची खोड तशी जुनीच. मात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केले तर तो कुणापुढेच झुकत नाही. शुक्रवारी दुपारी समुद्राला आलेल्या भरतीवेळी समुद्रात टाकण्यात आलेला कचरा जोरदार लाटांनी शहराला जशास तसा परत केला. सकाळपासून पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाच दुपारी २ वाजता समुद्राला भरती आली. या वेळी मरिन ड्राइव्हपासून गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर उसळलेल्या ४ मीटर उंचीच्या लाटांमुळे समुद्रातील ३ ते ४ टन कचरा पुन्हा किनाऱ्यावर आला.

Web Title: Mumbai's traffic on the 'Slow' track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.