मुंबईची पाण्याची चिंता मिटली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2016 05:50 AM2016-08-03T05:50:32+5:302016-08-03T05:50:32+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.
मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. तुळशी तलाव आधीच भरला होता. धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे विहार, मोडक सागर आणि तानसा हे तिन्ही तलाव गेल्या २४ तासांत एकानंतर एक भरून वाहू लागले आहेत. मुंबईच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सात तलावांत एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते. आतापर्यंत सातही तलावात ११ लाख ८९ हजार ९४५ लक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे.गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पालिकेने मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली होती. मात्र तुळशी तलाव भरल्यावर ही पाणीकपात त्वरित मागे घेण्यात आली. विहार तलावातून दररोज ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मोडक सागर तलावातून दररोज ५५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर तानसा तलावातून दररोज अंदाजे ६०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तुळशी तलाव १९ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. विहार तलाव हा १ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. मोडकसागर तलाव हा १ आॅगस्ट रोजीच्या रात्री १० वाजून २८ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. २ आॅगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे.