मुंबापुरी महागडीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 02:13 AM2017-03-04T02:13:18+5:302017-03-04T02:13:18+5:30
देशाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा आता महागड्या शहरांतही समावेश झाला
मुंबई : देशाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा आता महागड्या शहरांतही समावेश झाला आहे. जगातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबईचा २१ वा क्रमांक लागला आहे. नाइट फ्रँक वेल्थ अहवालानुसार मुंबईने टोरंटो, वॉशिंग्टन डीसी आणि मॉस्कोसारख्या शहरांना मागे टाकले आहे.
नाइट फ्रँक वेल्थ अहवालानुसार, दिल्लीने बँकॉक, सिएटल, जकार्ता या शहरांवर मात केली आहे. दिल्लीने ३५ वा क्रमांक पटकावला आहे. जागतिक सर्वाधिक श्रीमंत लोकसंख्या असलेल्या ८९ देशांतील १२५ शहरांचा अभ्यास सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार मागील दशकभरात भारतात २९० टक्क्यांनी अतिश्रीमंतांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, भविष्यातील संपत्तीधारकांच्या यादीत मुंबईचा अकरावा क्रमांक आहे. या यादीतही मुंबईने शिकागो, सिडनी, पॅरिस, सेऊल, दुबई या शहरांना मागे टाकले आहे. सर्वांत महागड्या मुख्य निवासी (प्राइम रेसिडेन्शियल) शहरांमध्ये मुंबई पंधराव्या स्थानी आहे. महागड्या शहरांच्या यादीत समावेश झाल्याने मुंबईचा भाव आणखीच वधारला आहे. (प्रतिनिधी)
>जगभरातील देशांचे सर्व्हेक्षण
नाइट फ्रँक वेल्थ अहवालासाठी जगातील ८९ देशांतील १२५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. २०० कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या लोकांची नोंद अहवालात आहे. देशातील सर्वाधिक १ हजार ३४० श्रीमंत मुंबई शहरात आहेत. दिल्लीत ६८०, कोलकात्यात २८० आणि हैदराबाद येथे २६० श्रीमंतांची नोंद झाली आहे. जगातील सर्वांत महागड्या शहरांच्या यादीत मुंबई २१ व्या स्थानी आहे. देशातील अतिश्रीमंतांचा घर घेण्याचा कल सिंगापूर, यूके, यूएई आणि हाँगकाँगकडे आहे. २०१५ पासून पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि मुंबईमध्ये श्रीमंतांची संख्या वाढते आहे.
>न्यू वर्ल्ड वेल्थ अहवाल काय म्हणतो?
मुंबईमध्ये ४६ हजार कोट्यधीश आणि २८ अब्जाधीश राहतात. मुंबईची एकूण मालमत्ता ८२० अब्ज डॉलर आहे. मुंबई देशातील सर्वांत श्रीमंत शहर आहे.
दुसऱ्या स्थानी दिल्ली, तिसऱ्या स्थानी बंगळुरू आहे. दिल्लीत कोट्यधीशांची संख्या २३ हजार असून, अब्जाधीश १८ आहेत. दिल्लीची एकूण मालमत्ता ४५० अब्ज डॉलर आहे. बंगळुरूची एकूण मालमत्ता ३२० अब्ज डॉलर आहे. बंगळुरूत ७ हजार ७०० कोट्यधीश आणि ८ अब्जाधीश राहतात.
हैदराबादची एकूण मालमत्ता ३१० अब्ज डॉलर आहे. हैदराबादमध्ये ९ हजार कोट्यधीश आणि ६ अब्जाधीश आहेत. कोलकात्यामध्ये कोट्यधीशांची संख्या ९ हजार ६०० असून, ४ अब्जाधीश आहेत. कोलकाता शहराची एकूण मालमत्ता २९० अब्ज डॉलर आहे. पुण्याची एकूण मालमत्ता १८० अब्ज डॉलर आहे. पुण्यात ४ हजार ५०० कोट्यधीश आणि ५ अब्जाधीश राहतात.
देशाची एकूण मालमत्ता ६ हजार २०० अब्ज डॉलर आहे. देशात २ लाख ६४ हजार कोट्यधीश आणि ९५ अब्जाधीश आहेत. दरम्यान, या यादीत चेन्नई, चंदिगढ, सुरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, जयपूर, वडोदरा या शहरांचा समावेश आहे.