मुंब्रावासियांचा पाण्याचा पुरवठा आठ एमएलडीने वाढविणार
By admin | Published: March 10, 2016 08:30 PM2016-03-10T20:30:29+5:302016-03-10T20:32:42+5:30
एमआयडीसीकडून मुंब्रा आणि कळव्यातील नागरिकांना सापत्न वागणूक मिळत असल्याने या भागात ४ दिवस शटडाऊन घेतले जात आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १० - एमआयडीसीकडून मुंब्रा आणि कळव्यातील नागरिकांना सापत्न वागणूक मिळत असल्याने या भागात ४ दिवस शटडाऊन घेतले जात आहे. त्यामुळे इथल्या हजारों नागरिकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईच्या महापे गावातील एमआयडीसी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.
या मोर्चात ऋता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाची दखल घेत पाणीपुरवठा अभियंता प्रकाश चव्हाण यांनी मुंब्रा कळव्याला ३२ एमएलडी वरून ४०.५०एमएलडी पाणीपुरठा करू असे आश्वासन दिले.
मुंब्रा आणि कळवा ही शहरे ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील आहेत. मात्र, असे असतानाही या शहरांना ठाणे महानगर पालिकेमार्फत थेट पाणी पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामार्फत (एमआयडीसी) थेट पाणीपुरवठा केला जातो.
परिणामी या पाणी वितरणावर ठाणे महानगर पालिकेचे नियंत्रण नाही. म्हणून एमआयडीसी मनमानी पद्धतीने पाणीकपात करून मुंब्रा आणि कळव्यावर अन्याय करते. त्याकरिता या विभागातील हजारो नागरिकांनी गुरुवारी दुपारी भर उन्हात एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला.
पाणी दो, पाणी दो..कळवा मुंब्रापर अन्याय करना बंद करो, अशा घोषणा देत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा एमआयडीसी गेटवर पोहचला. या गेटवर पोलिसांनी हा मोर्चा घडविला. त्यामुळे संतफ्त मोर्चेकऱयांनी डोक्यावरील मडके एमआयडीसीच्या दारात फोडून निषेध व्यक्त केला.
यावेळी एमआयडीसी परिसर मोर्चेकऱयांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिष्टमंडळाला घेऊन मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता, एरिगेशनच्या निर्णयाने पाणी कपातीचा निर्णय घेतला असल्याने मुंब्रा आणि कळव्याला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो अशी माहिती दिली.तर आता आपण या शहरांना ३२ एमएलडी एवढे पाणी पुरवठा करीत असून लवकरच त्यात वाढ करू असे आश्वासन दिले. तर आव्हाड यांनी एमआयडीसीने इथल्या त्रस्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊ नये असा इशारा देत त्वरित या भागांना ३६ एमएलडी एवढे पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली.
तर, पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी ठाणे महानगर पालिकेतील सत्ताधाऱयांना टार्गेट करीत, सत्ताधार्यांनी २००३ मध्येच शाई धरण बांधण्याचा निर्णय घेतला असता तर आता ठाणेकरांवर पाण्यासाठी असे हात पसरावे लागले नसते, अशी खंत व्यक्त केली. दुसर्याकडे पाणी विकत घेऊनही ठाणे महानगर पालिकेचकडे पाणी वाटपाबाबतचे योग्य नियोजन नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
मुंब्रा आणि कळव्याला जास्त दाबाने पाणी पुरवठा व्हावा याकरिता येत्या शनिवारी पाहणे महानगर पालिकेचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि येथील नगरसेवक यांची सकाळी १० वाजता मुंब्रा येथे एकत्रित बाबी वाटप आणि दाबासाठी बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या मोर्च्यात ऋता आव्हाड, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष शानु पठाण, शमीम खान आदी मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.