मुंडेंच्या श्रद्धांजलीवरून कामकाज दोनवेळा तहकूब
By admin | Published: June 5, 2014 09:53 PM2014-06-05T21:53:46+5:302014-06-05T22:28:57+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्र्द्धांजली वाहणारी भाषणे सभागृहात व्हावीत की नाही यावरून वाद निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज गुरुवारी दोनवेळा तहकूब करावे लागले.
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्र्द्धांजली वाहणारी भाषणे सभागृहात व्हावीत की नाही यावरून वाद निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज गुरुवारी दोनवेळा तहकूब करावे लागले.
सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजपाचे ज्येष्ठ सदस्य गिरीश बापट यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे अनेक सदस्यांना करायची असल्याने त्यास अनुमती द्यावी, अशी मागणी अध्यक्ष दिलीप वळसे -पाटील यांच्याकडे केली. भाजपाचेच देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी ही मागणी लावून धरली.
मुंडे यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र, त्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव सभागृहाचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी सभागृहात मांडला होता आणि तो मंजूरही करण्यात आला. तेव्हा विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शोकसभा घ्यावी,असा प्रस्ताव या आधीही आला होता, असे सांसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
मुंडे यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी परंपरा बाजूला ठेवून दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली. सांसदीय कामकाज मंत्र्यांनी आपल्या दालनात सत्तापक्ष आणि गटनेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, असे अध्यक्ष वळसे पाटील यांनी सांगितले आणि कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब केले.
त्यानंतरही निर्णय न होऊ शकल्याने कामकाज आणखी अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले. शेवटी अध्यक्षांच्या दालनात बैठक होऊन तोडगा काढण्यात आला. आता मुंडे यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे शुक्रवारी सभागृहात होतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आणि कामकाजाला सुरुवात झाली. (विशेष प्रतिनिधी)