मुंडे सूतगिरणीस अर्थसाहाय्य
By admin | Published: September 2, 2015 01:08 AM2015-09-02T01:08:47+5:302015-09-02T01:08:47+5:30
बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसाहाय्य करण्यासाठी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी (ता. केज, जि. बीड) व श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादक
मुंबई : बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसाहाय्य करण्यासाठी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी (ता. केज, जि. बीड) व श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादक मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी (ता. बदनापूर, जि. जालना) या राज्यातील दोन मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांची निवड करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. अशाप्रकारे अर्थसाहाय्य मिळण्याकरिता नोंदणी केलेल्या १९ सूतगिरणी प्रतीक्षेत आहेत. या सहकारी सूतगिरण्यांची प्रकल्प अहवालानुसार किंमत ६१ कोटी ७४ लाख रुपये आहे. या सूतगिरण्यांना मंजूर आकृतीबंधाप्रमाणे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, नांदेड, अमरावती आणि बीड या कापूस उत्पादक जिल्ह्यातील ८० टक्के, तर उर्वरित क्षेत्रातील २० टक्के सहकारी सूत गिरणींना शासकीय अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीसाठी सभासद भांडवल पाच टक्के, शासकीय भागभांडवल ४५ टक्के आणि शासकीय कर्ज ५० टक्के याप्रमाणे अर्थसाहाय्य करण्यात येते. या दोन्ही सूतगिरणींच्या उभारणीनंतर त्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल व शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळेल.
आतापर्यंत १६ सहकारी सूत गिरण्यांचा वेगवेगळ््या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)