मुंडेंचा काँग्रेसप्रवेश मनमोहन यांनी टाळला
By admin | Published: February 8, 2017 05:36 AM2017-02-08T05:36:21+5:302017-02-08T05:36:21+5:30
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेसप्रवेश तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे रोखला गेला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते
मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेसप्रवेश तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे रोखला गेला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना अजित पवार यांनी २०१२-१३मधील आजवर पडद्याआड राहिलेल्या एका राजकीय घडामोडीचा पटच उघड केला. भाजपामध्ये घुसमट होत असल्याने गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मुंडे तेव्हा लोकसभेचे उपनेते होते. उपनेत्याने अशा प्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असे सांगून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही, असा दावा पवार यांनी केला. मुंडे यांनी पक्ष सोडण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी समजूत घातल्यावर मुंडेंनी निर्णय बदलला, अशी पुस्तीही पवारांनी जोडली.
पवारांना पाहून मुंडेंनी वाढदिवस ठरवला
गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची जन्मतारीख १२ डिसेंबर अशी आहे. याच दिवशी ते आपला वाढदिवस साजरा करीत असत. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचे समजेल, असे सांगत गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. १९८०च्या सुमारास पवारांभोवती वलय होते. त्यांचा वाढदिवस राज्यभरात उत्साहाने साजरा केला जातो, हे पाहूनच मुंडेंचा वाढदिवस १२ डिसेंबरला जाहीर करण्यात आला, ही माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिली आहे, असा दावाही पवार यांनी केला.