मुंडेंच्या श्रद्धांजली सभेबाहेर रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली!
By admin | Published: June 16, 2014 04:10 AM2014-06-16T04:10:57+5:302014-06-16T04:10:57+5:30
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या येथील श्रद्धांजली सभेदरम्यान सभागृहाबाहेर काँग्रेस पदाधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर खाली पडून त्यामधून चुकून एक गोळी सुटली
अहमदनगर : केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या येथील श्रद्धांजली सभेदरम्यान सभागृहाबाहेर काँग्रेस पदाधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर खाली पडून त्यामधून चुकून एक गोळी सुटली. सुदैवाने त्यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र त्यामुळे सभास्थळी एकच धावपळ झाली.
घटनेप्रकरणी संभाजी देवराम रोहोकले (वय ६१, रा. भाळवणी, ता. पारनेर) यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहोकले यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात रविवारी दुपारी श्रद्धांजली सभा सुरू असताना हा प्रकार घडला. सभा सुरू असताना ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे यांचे भाषण संपल्यानंतर ते सभागृहाबाहेर पडत होते. त्या वेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संभाजी रोहोकले हे विखे यांना भेटण्यासाठी सभागृहाबाहेर निघाले. या वेळी रोहोकले त्यांची पॅण्ट सावरत असताना कमरेच्या डाव्या बाजूला बेल्टला लावलेले आणि लोडेड असलेले रिव्हॉल्व्हर अचानकपणे खाली पडले. त्यामधून एक गोळी सुटली आणि ती सभागृहाबाहेरील पोर्चच्या छताला लागली. सुदैवाने ही गोळी स्वत: रोहोकले यांना आणि पोर्चमध्ये थांबलेल्या कोणालाही लागली नाही. मात्र श्रद्धांजली सभा सुरू असताना सभागृहाबाहेर स्फोटासारखा आवाज आला. त्यामुळे सभागृहातील लोक घाबरून पळू लागल्याने एकच गोंधळ उडाला. प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रोहोकले यांना सावरले. त्या वेळी ते घाबरलेल्या अवस्थेत होते.
रोहोकले यांनी बाळगलेले रिव्हॉल्व्हर हे २००६ चे परवानाधारक असून ते त्यांनी अंबरनाथ येथून खरेदी केले होते. स्वसंरक्षणार्थ त्यांनी ते बाळगले होते. ते नेहमीच सहा राउंड लोड करून ठेवतात. (प्रतिनिधी)