मुंढे यांचा लेट लतिफांना दणका
By admin | Published: March 31, 2017 03:32 AM2017-03-31T03:32:32+5:302017-03-31T03:32:32+5:30
पीएमपीएमएलचे नूतन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिला दणका लेट लतिफांना दिला असून
पुणे : पीएमपीएमएलचे नूतन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिला दणका लेट लतिफांना दिला असून, उशिरा कामावर आलेल्या तब्बल १२० कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश दिले आहेत.
पीएमपीचे कर्मचारी फक्त सात तास काम करत असल्याचे मुंढे यांनी निदर्शनास आणले. त्यावर लगेचच बैठक घेऊन कामाच्या वेळेत एक तास वाढ करत सकाळी पावणेदहा ते संध्याकाळी पावणेसहा अशी कार्यालयीन कामकाजाची वेळ ठरवून दिली. तसेच, वेळेत कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचीही तंबीही त्यांनी दिली होती. त्यानुसार सर्व प्रशासकीय कार्यालये, डेपो, सेंट्रल वर्कशॉपमधील ११७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई करत मुंढे यांनी धडाकेबाज कामाचा प्रत्यय दिला. पीएमपीएमलची स्थिती समजून घेण्यासाठी मुंढे यांनी गुरुवारी दिवसभर बैठकांचा धडाका लावला होता. कंपनीतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी फायली घेऊन धावपळ करताना दिसत होते. पीएमपीच्या अनेक बस सध्या नादुरुस्त आहेत. त्यांचा आढावाही मुंढे यांनी घेतला. तसेच, त्यातील १०० बसेसच्या दुरुस्तीसाठी त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पुढील १५ दिवसांत त्या बस रस्त्यावर आल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या.
एक कोटी रुपयांचा निधी
पीएमपीच्या ताफ्यातील बंद असलेल्या गाड्या त्वरित सुरू व्हाव्यात, यासाठी तुकाराम मुंढे यांनी पावले उचलली आहेत. पीएमपीच्या बंद पडलेल्या १०० गाड्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीद्वारे गाड्यांचे सुटे भाग खरेदी तसेच दुरुस्तीचे काम होणार असून, येत्या १५ दिवसांत या बंद गाड्या मार्गावर आणण्यात येणार आहेत.
शिस्तीची कर्मचाऱ्यांना धास्ती
तुकाराम मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे स्वीकारताच कर्मचाऱ्यांसाठी कामासंदर्भात आचारसंहिता आखून दिली. यामध्ये कामाच्या वेळेपासून गणवेश, केस, दाढी, टापटीपपणा या गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्या शिस्तीचा धसका घेऊन गुरुवारी सर्व कर्मचारी ओळखपत्र, गणवेश याबाबत सतर्क असल्याचे दिसून आले.