गरिबांसाठी पालिकेची महाविद्यालये

By admin | Published: April 4, 2017 04:20 AM2017-04-04T04:20:32+5:302017-04-04T04:20:32+5:30

पालिकेने विविध योजना हाती घेतल्या असतानाच आता गोरगरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे

Municipal Colleges for the poor | गरिबांसाठी पालिकेची महाविद्यालये

गरिबांसाठी पालिकेची महाविद्यालये

Next

ठाणे : ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने विविध योजना हाती घेतल्या असतानाच आता गोरगरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी पीपीपी तत्त्वावर महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
मागील काही वर्षांपासून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत आहे. ती वाढवण्यासाठी ई लर्निंग, सिग्नल स्कूल, कल्पना चावला योजना, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आदींसह विविध उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. परंतु, यंदा शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडीत काढून शिक्षणाच्या विविध वाटा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यानुसार, स्मार्ट आयडीकार्ड योजना आणली आहे. यात सर्व शाळांतील विद्यार्थी तसेच शिक्षकांची हजेरी यांची नोंद नकळत होणार असून विद्यार्थ्यांचा वर्षभर गुणवत्ता आलेख, तसेच तो शैक्षणिकदृष्ट्या व शारीरिक दृष्टीने कोणत्या स्थितीत आहे, सतत गैरहजर राहण्याची कारणे, गृहपाठ तसेच भाषा व गणित क्षमतेचा विकास व शालेय उपक्रमात सहभाग आदींचे अचूक निरीक्षण त्यात होणार असल्याने शाळा प्रगत होण्याच्या दृष्टीने या योजनेसाठी २ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, मुंब्रा येथे प्लॅटफॉर्म स्कूल, शैक्षणिक सहकार्य हेतू विकीपीडियाची मदत, इंग्रजी शाळा सुधारणा कार्यक्रम, कृतीयुक्त अभ्यासक्रम, १० सेमी इंग्रजी स्मार्ट स्कूलची निर्मिती, विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देणे, डिजिटल शाळा, आदर्श शाळा, रात्रशाळा, ज्ञानरचनावाद, गणितीय लॅब, मॉडेल स्कूल आदी योजना हाती घेतल्या आहेत.
दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तथा बहुउद्देशीय संसाधन केंद्र उभारण्याचाही निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार, रोटरी क्लब आॅफ लेक सिटी, ठाणे या संस्थेमार्फत शाळा क्रमांक-९ पूर्व येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आॅडिओ बुक्स ब्रेललिपीचे किट व या संबंधीच्या सॉफटवेअरच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची तयारी तसेच यूपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी आॅडिओ लायब्ररी नॅब या संस्थेच्या वतीने व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आदी सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेश व ५० टक्के या संस्था अल्पदराने फी आकारून संस्थेचा खर्च भागवणार आहेत. यासाठी ५ लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. (प्रतिनिधी)
>पीपीपीच्या माध्यमातून उच्च माध्यमिक शाळेची उभारणी
महापालिका आता पीपीपीच्या माध्यमातून उच्च माध्यमिक शाळेची उभारणी करणार असून यामागे विद्यार्थी पटसंख्या टिकवणे, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची परिस्थितीअभावी होणारी गळती थांबवणे व पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे, दर्जेदार शिक्षण पीपीपी तत्त्वावर देणे, विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या सृजनशीलतेला व आत्माविष्काराला वाव देणे हा यामागचा हेतू आहे. त्यानुसार, अकरावी, बारावीपर्यंत या उच्च माध्यमिक शाळेची उभारणी केली जाणार आहे. या ठिकाणी महापालिका शाळेत शिकलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी महापालिकेमार्फत संबंधित संस्थेला इमारत व इतर सुविधा पुरवण्यात येणार आहे. मात्र, इतर सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाणार असल्याने मनपावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. त्याचप्रमाणे उच्च माध्यमिकचा नियमित अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाची पूर्वतयारी करून घेण्याची जबाबदारीदेखील संबंधित संस्थेची असणार आहे.

Web Title: Municipal Colleges for the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.